टँकर गॅस गळती; शहर पूर्ववत होण्यासाठी का लागले १४ तास, घटना सर्व यंत्रणांसाठी केसस्टडी 

By विकास राऊत | Published: February 2, 2024 12:14 PM2024-02-02T12:14:57+5:302024-02-02T16:22:24+5:30

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: गॅस स्फोटक असल्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सावधगिरीने पावले उचलली जात होती.

Tanker Gas Leakage; Why it took 14 hours for the city to recover, the incident is a case study for all systems | टँकर गॅस गळती; शहर पूर्ववत होण्यासाठी का लागले १४ तास, घटना सर्व यंत्रणांसाठी केसस्टडी 

टँकर गॅस गळती; शहर पूर्ववत होण्यासाठी का लागले १४ तास, घटना सर्व यंत्रणांसाठी केसस्टडी 

छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील उड्डाणपुलालगतच्या दुभाजकाला टँकर धडकल्यामुळे लागलेल्या गॅस गळतीने शहरातील मुख्य जीवनवाहिनी असलेला जालना रोड तब्बल १४ तास जाम केला. तांत्रिक माहितीचा अभाव, प्रभारी जिल्हाधिकारी आणि एचपीसीएलकडे बचावकार्यासाठी नसलेल्या यंत्रणेमुळे शहर पूर्ववत होण्यासाठी १४ तासांचा वेळ गेला. घटना शहरात घडल्यामुळे महापालिकेलाच फ्रंटवर यावे लागले. पोलिसांनी बंदोबस्त चोखपणे लावला, तर जिल्हा प्रशासनाने १४४ नुसार जमावबंदीचे आदेश जारी केले.

शहरात अशी घटना पहिल्यांदाच घडली. त्यामुळे सकाळपासून बचावकार्य सुरू झाले, परंतु सगळी प्रशासकीय यंत्रणाच नेमके काय करावे, या विवंचनेत होती. गॅस स्फोटक असल्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सावधगिरीने पावले उचलली जात होती. पालिका प्रशासक जी. श्रीकांत, प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, पोलिस आयुक्त मनोज लोहीया, अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्यात चर्चा झाल्यानंतर बचावकार्याला वेग मिळाला. एचपीसीएलचे प्रकल्प व्यवस्थापक प्रईस जेम्स यांनी वाहतूक कंत्राटदाराकडे बोट दाखविले. त्यांनी तांत्रिक विषयावर, त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी काय साधन सामग्री आहे, याबाबत काहीही माहिती दिली नाही. दरम्यान, प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, शहरात अशी घटना होण्याचा व बचाव कार्याचा पहिला अनुभव होता. उपायुक्त नितीन बगाटे यांनीदेखील अशीच प्रतिक्रिया नोंदविली.

एनडीआरएफचे स्वतंत्र युनिट हवे....
अपघाताची सकाळी ९ वाजता एनडीआरएफ टीमला माहिती देण्यात आली. पुण्यातील फाईव्ह एनडीआरएफचे निरीक्षक चंद्रकेतू शर्मा, योगेश शर्मा यांच्यासह २५ जवान दुपारी ३ वाजता शहरात दाखल झाले. मात्र, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली होती. मराठवाड्यासाठी एनडीआरएफच्या स्वतंत्र युनिटची गरज यानिमित्ताने जाणवली.

घटना सर्वांसाठी केसस्टडी...
शहरात पहिल्यांदाच अशी घटना घडली. गॅसगळती पाहण्यासाठी कुणीही समोर जाण्यास तयार नव्हते. तज्ज्ञ व सुविधांचा अभाव जाणवला. अशा घटनांना योग्य प्रकारे सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफच्या टीमसह तांत्रिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही घटना सर्वांसाठी केसस्टडी असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

चार तास तर काही कळालेच नाही...
अपघात झाल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत यंत्रणेला घटनेचे गांभीर्यच कळाले नाही. एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा गॅस गळतीमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले, तेव्हा सगळी प्रशासकीय यंत्रणा वेगाने अलर्ट होऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले.

तीन वॉर्डांत कलम १४४ लागू केले...
एच.पी. कंपनीच्या गॅस टँकरला अपघात होऊन मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. तो गॅस हवेमध्ये पसरण्यास सुरुवात झाली. या अपघातस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने आणि सुमारे ४० हजारांच्या आसपास नागरी वास्तव्य आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सिडको एन-३, एन-४, एन-५ परिसरातील सर्व शाळा व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उपजिल्हा दंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जारी केले. सकाळपासून ते गॅस गळतीची घटना पूर्णत: नियंत्रणात येईपर्यंत हे आदेश लागू होते.

Web Title: Tanker Gas Leakage; Why it took 14 hours for the city to recover, the incident is a case study for all systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.