दशक्रिया विधीसाठी वापरावे लागतेय टँकरचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:51 PM2019-05-02T18:51:50+5:302019-05-02T18:52:45+5:30

पाणी विकत घेऊन गोदास्नान उरकावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र

Tanker water needs to be used for decade | दशक्रिया विधीसाठी वापरावे लागतेय टँकरचे पाणी 

दशक्रिया विधीसाठी वापरावे लागतेय टँकरचे पाणी 

googlenewsNext

- संजय जाधव
पैठण (औरंगाबाद ) : दक्षिण काशी पैठण म्हणून मान्यता असलेल्या पैठण नगरीतील गोदावरीचे पात्र आटल्याने दशक्रिया विधी टँकरचे पाणी विकत घेऊन करण्याचा बाका प्रसंग नागरिकांवर ओढवला आहे. गोदावरीच्या झऱ्यातील पाणी विकत घेऊन गोदास्नान उरकावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र गोदामायेच्या पात्रात दिसून येत आहे. गेल्या सहा दशकात सन २०१६ नंतर यंदा गोदेचे पात्र आटल्याने धार्मिक विधी साठी आलेल्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. प्रशासनाने विधीसाठी अल्पदरात टँकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. 

 भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते या नद्यांच्या परिसरातच संस्कृतिचा जन्म व विकास झाला दक्षिण भारतात गोदावरीच्या सानिध्यात संस्कृती रूजली असे मानले जाते. पैठण शहरात गोदावरी पित्रमुखी (दक्षिण मुखी) वाहते म्हणून दक्षिणेतील काशी म्हणून पैठण नगरिचे महत्व आजही अबाधित आहे  गोदावरीच्या तीरावर पिंडदान, दशक्रिया विधी, अस्थिविसर्जन, सिंहस्थविधी, कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी, नियमित होत आले आहेत हे विधी करण्यासाठी  भाविक हजारोच्या संखेने दररोज पैठण शहरात दाखल होतात 

गोदावरी आटली...
नाथषष्ठी साठी गोदावरीच्या पात्रातील पाणी सोडून देण्यात आले, कोरड्या झालेल्या पात्रात वारकऱ्यांची सोय करण्यात आली. या नंतर जायकवाडी ची पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद पडला व गोदावरीत जलविद्युत प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा स्रोत बंद झाला. गेल्या पंधरा दिवसा पासून उन्हाच्या दाहकतेने गोदावरीतील पाणी बाष्पीभवन प्रक्रिये द्वारे उडून गेले व गोदावरी कोरडी झाली. गोदावरी पात्रात पाणी आहे असे समजून विधीसाठी आलेल्या भाविकांना ऐनवेळी टँकर चे पाणी विकत घेउन विधी उरकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. टँकरच्या पाण्याने पात्रात उभे राहुन केलेल्या स्नानास गोदास्नान मानण्याची वेळ ओढवलीआहे.

६०० रूपये टँकर.....
दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना स्नानासाठी टँकर विकत घ्यावे लागत आहे. गोदावरीच्या पात्रात आठ ते दहा टँकर उपलब्ध असून एका टँकरसाठी ६०० रूपये मोजावे लागत आहेत. ऐन वेळी पाण्याच्या टँकरसाठी दाम मोजावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोदावरीच्या झऱ्यातून पाणी पुरवठा
स्थानिक नागरिकांनी दुष्काळाच्या  परिस्थितीत रोजगार शोधला असून गोदावरीच्या पात्रात खोल झरे खोदुन त्यात पाझरलेले पाणी ते स्वस्तात भाविकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. ज्या नागरिकांना टँकर घेउन दशक्रिया विधी करणे परवडत नाही अशा नागरिकांना या झऱ्यातील पाण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. पाच रूपयात या झऱ्यातून बकेट भर पाणी दिले जात आहे. नाथषष्ठी नंतर ताबडतोब गोदावरी पात्रात पाणी सोडले असते तर आज अशी भिषण परिस्थिती ओढवली नसती अशी चर्चा होत  आहे.

Web Title: Tanker water needs to be used for decade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.