...तर २०२४ नंतर मोदी निवडणुका होऊ देणार नाहीत : भाई वैद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 10:50 PM2017-07-27T22:50:11+5:302017-07-27T22:50:25+5:30
नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्रमक टीका करीत जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी सर्व दलित व वंचितांना मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले
मयूर देवकर
औरंगाबाद, दि. 27 - ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्रमक टीका करीत जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी सर्व दलित व वंचितांना मतभेद विसरून एक त्र येण्याचे आवाहन केले. ‘फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदे’तर्फे गुरुवारी (दि.२७) आयोजित ‘संघर्ष परिषदे’मध्ये ते बोलत होते.
‘पुरोगामी, डाव्या आंबेडकरी चळवळींसमोरील आव्हाने’ या विषयावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारची तुलना हिटलरच्या हुकूमशाहीशी केली. ते म्हणाले, ज्या प्रकारे हिटलरने विरोधकांना समूळ नष्ट करून स्वत:चे अराजक साम्राज्य स्थापित केले, त्याच्याशी साम्य असणारी परिस्थिती सध्या भारतात आहे. संघप्रणीत मोदी सरकारचे दडपशाहीचे धोरण पाहता २०१९ मध्ये जर त्यांचा विजय झाला, तर २०२४ नंतर आपल्या देशात निवडणुका होणार नाहीत, अशी भीती वाटते. लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आले आहे.
भारताला हिंदू राष्ट्र करताना भारतीय समाजव्यवस्थेचा पाया असलेली राज्यघटना बदलण्यासही संघ कचरणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे नाझी साम्राज्याचा बीमोड करण्यासाठी मित्र देश एकत्र आले होते, त्याप्रमाणे समाजातील सर्व गोरगरीब, मागास, वंचित, पीडित, दलित, परिवर्तवादी, समाजवादी, डावे यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढण्याची गरज आहे. तरच हे धोकादायक आव्हान पेलले जाऊ शकते, असे वैद्य म्हणाले.
उपेक्षितांच्या संघर्षाबाबत सुभाष लोमटे म्हणाले की, एकाच विचारांसाठी लढणाºया विविध संघटनांचे विघटन जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत भांडवलशाही व जातीयवादी शत्रूशी दोन हात करता येणार नाहीत. डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, लोकशाहीमध्ये अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्याने दडपशाही करून अल्पसंख्याकांना दुर्बल केले जात आहे.
३९ वर्षांपूर्वी २७ जुलै रोजी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत पारित झाला होता. त्याचे औचित्य साधून गुरुवारी संत तुकाराम महाराज नाट्यगृहात ‘संघर्ष परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा अहिरे होत्या. यावेळी मंचावर रमेश खंडागळे, मिलिंद पाटील, अजमल खान, भीमराव सोनवणे, लक्ष्मण जाधव पाटील, राम बाहेती, अण्णा खंदारे, वर्षा गुप्ते आदींची उपस्थिती होती.
हा इतिहास का सांगत नाही?
नरेंद्र मोदी वेद-पुराणांतील कथांचे दाखले देऊन भारतात कशी संपूर्ण जगाला ज्ञान देण्याची, आदर्श नेतृत्व प्रदान करण्याची क्षमता आहे याचा सगळीकडे प्रचार करतात. मात्र, आमच्या देशात हजारो वर्षांपासून दलितांवर किती अत्याचार आणि अन्याय केला जातोय याविषयी ते का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करून जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचा १३४ वा क्रमांक आहे याकडे भाई वैद्य यांनी लक्ष वेधले.