लातूर शहरात रमाई घरकुल योजनेत ३०० घरांचे उद्दिष्ट, साडेसात कोटींची आवश्यकता

By हणमंत गायकवाड | Published: March 11, 2024 03:59 PM2024-03-11T15:59:40+5:302024-03-11T16:00:16+5:30

ज्यांना घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे, अशा व्यक्तींसाठी रमाई घरकुल योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविली जाते.

Target of 300 houses in Ramai Gharkul Yojana in Latur city, requirement of 7.5 crores | लातूर शहरात रमाई घरकुल योजनेत ३०० घरांचे उद्दिष्ट, साडेसात कोटींची आवश्यकता

लातूर शहरात रमाई घरकुल योजनेत ३०० घरांचे उद्दिष्ट, साडेसात कोटींची आवश्यकता

लातूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजना लातूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येते. आतापर्यंत या योजनेंतर्गत ४ हजार १९५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी २७०२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर सद्य:स्थितीत ८३५ गुरुकुलांचे बांधकाम चालू आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षासाठी ३०० घराचे उद्दिष्ट असून त्यासाठी सात कोटी पन्नास लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

ज्यांना घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे, अशा व्यक्तींसाठी रमाई घरकुल योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविली जाते. लातूर महापालिकेमार्फत आतापर्यंत या योजनेत चार हजारांच्या वर घरकुलांना मंजुरी मिळाली असून जवळपास तीन हजारांपर्यंत घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचा ताबाही संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आला असून आणखीन गरजू लाभार्थ्यांना घरकुले देण्यात येणार आहेत. त्यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी ३०० घरांचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, बांधकामासाठी सात कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी लागेल, अशी अपेक्षा लातूर मनपाच्या वार्षिक अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आलेली आहे.

घरकुल योजनेसाठी या आहेत अटी
लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा, ज्याला घर नसावे, स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. लाभधारकाने ३० चौरस मीटरचे शौचालयासह बांधकाम करणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्र देऊन प्रस्ताव सादर करणे आवश्यक.

घरकुलांसाठी आतापर्यंत ९२ कोटींचा निधी
आतापर्यंत रमाई घरकुल योजनेत लातूर शहरातील घरकुलांसाठी लातूर मनपाला ९२ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये इतका निधी मिळाला आहे. त्यापैकी ७८ कोटी ९७ लाख ४० हजार रुपये इतका निधी खर्च झालेला आहे. २०११ ते २०२३-२४ पर्यंत हा निधी प्राप्त झाला आहे. आता पुढे तीनशे घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी शहा- सात कोटींवर निधी लागणार आहे.

एका घरकुलासाठी अडीच लाखांचे अनुदान
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लावारड्यांसाठी रमाई घरकुल योजना राबविण्यात येते. एका घरकुलासाठी दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असून तीन ते चार टप्प्यांमध्ये अनुदान संबंधित लाभार्थ्याला देऊन घरकुल तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार लातूर शहरांमध्ये २७०२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सद्य:स्थितीत ८३५ घरकुलांचे बांधकाम चालू आहे.

Web Title: Target of 300 houses in Ramai Gharkul Yojana in Latur city, requirement of 7.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.