३०-३० घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर; पैठणमधून एकाचे अपहरण, रांजणगावहून झाली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 07:06 PM2022-08-04T19:06:35+5:302022-08-04T19:10:12+5:30
रक्कम तिप्पट होण्याच्या लालसेने गुंतवलेली अनेकांचे लाखो रुपये बुडाल्याने पैसे जमा करणारे एजंट सध्या तोफेच्या तोंडावर आहेत.
पैठण (औरंगाबाद) : बुधवारी पैठण शहरातून अपहरण करण्यात आलेल्या तीस-तीस आर्थिक घोटाळ्यातील एजंटची अवघ्या काही तासांतच पैठण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथून गुरूवारी सुखरुप सुटका केली आहे.. या प्रकरणातील तीन अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी वाहनांसह फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
रक्कम तिप्पट होण्याच्या लालसेने गुंतवलेली अनेकांचे लाखो रुपये बुडाल्याने पैसे जमा करणारे एजंट सध्या तोफेच्या तोंडावर आहेत. राज्यभर तीस-तीस या नावाने हा आर्थिक घोटाळा गाजलेला आहे. पैठण तालुक्यातील बोकुडजळगाव येथील एजंटचे अपहरण करण्यामागे तीस-तीस घोटाळाच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकीन येथील तीस-तीस आर्थिक घोटाळ्यातील एजंट दिलीप जानु चव्हाण( रा. बोकुड जळगाव तालुका पैठण) हा बुधवारी चार वाजेच्या दरम्यान पैठण येथील रजिस्टरी कार्यालयात जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी आला होता. दरम्यान, मारोती मुरलीधर नागे, रामनाथ मुरलीधर कोल्हे, कृष्णा कल्याण तरमळे, पांडुरंग सदाशिव नागे, दिनेश प्रमोद राठोड (रा. बोकुड जळगाव पैठण) यांनी दिलीप चव्हाणचे अपहरण केले. दरम्यान अपहरणकर्त्यांनी चव्हाणच्या मामास भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून तुमच्या भाच्याने आम्हाला पंचवीस लाख रुपयाला बुडविले आहे. पंचवीस लाख रुपये आम्ही सांगतो त्या ठिकाणी घेऊन या नसता तुमच्या भाच्याला कापून टाकू अशी धमकी दिली.
याबाबत दिलीप चव्हाण यांची पत्नी कविता चव्हाण हिने पैठण पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली. फिर्यादीत माझ्या नवऱ्याचे अपहरण कृष्णा तरमळे व दिनेश राठोड यांनी केले असा संशय व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पैठणचे पो.नि. किशोर पवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. बुधवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पो.नि. किशोर पवार यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथील एका लॉजवर छापा टाकून अपहरण झालेल्या दिलीप चव्हाणची सुटका केली.
यावेळी पोलिसांनी मारोती मुरलीधर नागे, रामनाथ मुरलीधर कोल्हे, दिनेश प्रमोद राठोड या तिघांना अटक केली तर कृष्णा कल्याण तरमळे व पांडुरंग सदाशिव नागे हे दोघे फरार झाले. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर पवार, उपनिरीक्षक सतिष भोसले, पो.का. महेश माळी, संतोष चव्हाण, भाऊसाहेब तांबे, संतोष खिळे, गोपाळ पाटील, सुधीर वाव्हळ, यांच्या पथकाने पार पाडली.
पोलिसांनी अशी केली सुटका
सहा महिन्यांपूर्वी पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांचा तीस-तीस नावाचा आर्थिक घोटाळा पोलिसांनी उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात दिलीप जानु चव्हाण याने तीन आरोपींकडून दाम दुप्पट करुन देतो म्हणून पंचवीस लाख रुपये घेतल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. दरम्यान बुधवारी दिलीप चव्हाण हा जमीन खरेदी विक्रीसाठी पैठण येथे आला आहे अशी माहिती आरोपींना मिळाली. यावेळी चव्हाण व आरोपी यांची भेट झाल्यावर त्यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणवरुन वाद झाला. त्यानंतर आरोपींनी दिलीप चव्हाण याचे अपहरण केले. त्यास वाहनांत बसवून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे नेले होते. पोलीसांनी तत्काळ सुत्रे हलवीत पहाटे तीन वाजेच्या दरम्यान लॉजवर छापा टाकून दिलीप चव्हाणची सुटका केली.