पेट्रोल-डिझेल वाहनांना ‘टाटा’; ई-वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:58 PM2021-07-31T18:58:41+5:302021-07-31T19:02:32+5:30
औरंगाबादेत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर ९८ रुपये झाला आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगा आता एकदाचे डोळेभरून पाहून घ्या. कदाचित आगामी काळात हे दृश्य पहायला मिळेलच हे सांगणे कठीण आहे. कारण अनेक जण पेट्रोल, डिझेल वाहनांना टाटा...बायबाय... करत आहेत आणि ई-व्हेइकल्स म्हणजे ईलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी खरेदी करीत आहेत. औरंगाबादेत गेल्या ३ वर्षांत प्रत्येकवर्षी जेवढी ई-वाहने वाढत गेली, त्यापेक्षाही अधिक वाहने यंदा ७ महिन्यांतच वाढली आहेत. ई-चारचाकींची संख्या यात अधिक आहे.
इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक परवड, हा विषय सार्वजनिक चर्चेचा व समस्येचाही आहे. औरंगाबादेत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर ९८ रुपये झाला आहे. आर्थिक भुर्दंडाबरोबरच इंधनाच्या वाहनांमुळे प्रदूषणही वाढते. यावर उपाय म्हणून ई-वाहनांना चालना देण्याचे धोरण देशपातळीवर स्वीकारण्यात आले आहे. औरंगाबादेतदेखील या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांवर गेली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून ई-वाहनांची भर पडते आहे. ई-वाहन म्हटले की, आधी फक्त दुचाकी नजरेसमोर येत होती. परंतु आता ई-चारचाकी वाहनेही रस्त्यावर धावत आहेत. सध्या या वाहनांचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, त्यांची संख्या आता वाढत आहे.
ई-वाहनांकडे का वाढतोय ओढा ?
- पेट्रोलच्या तुलनेत विजेचा कमी खर्च
- चार्जिंग करा अन् बिनधास्त चालवा
- आवाजाची पातळी अत्यंत कमी
- देखभाल-दुरुस्ती खर्च अत्यल्प
- ई-दुचाकी वजनाला हलकी-फुलकी
-आरटीओ करात सवलत
यावर्षी नोंदणी वाढली
ई-वाहनांच्या नोंदणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या ई-वाहनांची गती २५ किमी प्रतितासापेक्षा कमी आहे, अशा वाहनांची नोंदणी करण्याची गरज नाही. ई-वाहनांसाठी करात सवलतही मिळते.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
औरंगाबादेत ईलेक्ट्रिक वाहनांची अशी पडली भर
वर्ष-----दुचाकी-----चारचाकी----एकूण
२०२१(जुलैपर्यंत)-२५८----२०---२७८
२०२०---१५०----५----१५५
२०१९---२२२-----१----२२३
२०१८---२१९-----२----२२१