ऑरिकमध्ये ‘आयटी’ गुंतवणुकीसाठी टाटा सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:28 AM2020-01-21T11:28:17+5:302020-01-21T11:55:29+5:30
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत. टाटा समूहाचे तन्मय चक्रवर्ती आणि आफ्रिकेसह विविध देशांतील गुंतवणूकदार प्रकाश जैन यांच्यासमवेत मी ऑरिकमधील पायाभूत सुविधांची रविवारी पाहणी केली. त्यांनी गुंतवणूक करण्यास सकारात्मकता दर्शविल्याचा दावा उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी केला.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक चांगले झाले आहे, या क्षेत्रातील तज्ज्ञांना केवळ व्यवसाय सुलभता देऊन भागत नाही, तर जगण्यासाठी आवश्यक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात, असे प्रयत्न केले जातील, निवास आणि कामाचे संकुल एकच असावे, अशी मान्यता राज्याच्या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात समाविष्ट केलेली आहे, पुण्यातील हिंजेवाडीत आयटी क्षेत्राला वाहतूक कोंडीचा त्रास होत असे, त्यामुळे तेथे धोरणांमध्ये बदल करण्यात आले आहेत, तसेच औरंगाबादेत विरंगुळ्याची ठिकाणे वाढल्यास आयटीतील कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीप्रमाणे त्यांना येथे काम करता येईल. त्यासाठी धोरणात्मक निर्णय होतील, असे देसाई म्हणाले.
शेंद्रा-बिडकीन-वाळूजचा विचार
शेंद्रा- बिडकीन- वाळूज हा डीएमआयसीतील रस्ता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दुसऱ्या टप्प्यात करण्याबाबत १२ जानेवारी रोजी विधान केले. त्यावर उद्योगमंत्री देसाई म्हणाले, या रस्त्याचा विचार शासन करील, तसेच औरंगाबाद ते पैठण या रस्त्याचा डीपीआर होत आल्याचेही देसाई यांनी नमूद केले. डीएमआयसीने या रस्त्यासाठी काही प्रमाणात निधी ठेवला आहे. त्यातून हा रस्ता होईल काय, याची माहिती घेतली जाईल, असेही देसाई म्हणाले.
शाळांसाठी इन्फोसिसशी पत्रव्यवहार
औरंगाबाद पर्यटन जिल्हा असून, येथे पर्यटनाला वाव आहे. अजिंठा रस्त्यासह विमानतळ धावपट्टी वाढविणे, वेरूळ-अजिंठा महोत्सव, लाईट अॅण्ड साऊंड शोच्या मंजूर प्रकल्पात अधिक भर कशी घालता येईल यासह पर्यटनाच्या अनुषंगाने काय करावे, याचा अहवाल मागविला होता. येथील पर्यटन विकासासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दौरा करावा, अशी विनंती करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले, तसेच जिल्ह्यातील शाळांवरील छतांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यासाठी नियोजन विभागाकडे जास्तीचे अनुदान मागणार आहोत. सीएसआरसाठी इन्फोसिसचे नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे, असेही ते म्हणाले.