घरगुती ६५, व्यावसायिक मालमत्तेला १२८ टक्के वाढीव कर; फक्त नवीन मालमत्तांसाठीच निर्णय
By मुजीब देवणीकर | Published: February 14, 2024 08:03 PM2024-02-14T20:03:04+5:302024-02-14T20:03:44+5:30
१ एप्रिलपासून होणार अंमलबजावणी
छत्रपती संभाजीनगर : नवीन मालमत्तांना १ एप्रिलपासून महापालिका राज्य शासनाच्या रेंट व्हॅल्यू बेस पद्धतीवर कर लावणार आहे. ५०० चौरस फुटांच्या घराला पूर्वी ३ हजार ५९३ रुपये मालमत्ता कर लागत होता. आता त्यात ६५ टक्के वाढ केली. नवीन पद्धतीनुसार नागरिकांना ५ हजार ९४१ रुपये दरवर्षी द्यावे लागतील. तेवढ्याच आकाराच्या व्यावसायिक मालमत्तेला पूर्वी १४ हजार रुपये कर लागत होता. आता त्यात १२८ टक्के वाढ झाली. ३१ हजार ९२४ रुपये नवीन दराने कर लागणार असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रशासकांनी वारंवार नमूद केले की, जुन्या अडीच लाख मालमत्तांना नवीन कर रचनेत घेण्यात आलेले नाही. १ एप्रिलनंतर स्वत:हून आमच्या मालमत्तेला कर लावून द्या, म्हणून आलेल्यांनाच नवीन कर लागेल. त्यामुळे नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. दर पाच वर्षाला कराच्या दरात बदल करायला हवा. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने २०१२ पासून नवीन दराने कर लावलेला नाही. अनेक मालमत्तांना कर लावलेला नाही. ही मनपाची उदासीनताही म्हणू शकता. मनपा, उपायुक्त आणि वाॅर्ड स्तरावर कर समाधान शिबिर घेतले जात आहे. शुक्रवारी हर्सूल येथील ११० घरांच्या सोसायटीने एकाचवेळी जुन्या दराने कर लावून घेतला. ही संधी फक्त ३१ मार्चपर्यंत आहे. शैक्षणिक संस्थांनी धर्मादाय संस्था म्हणून विविध कागदपत्रे जमा करावीत. त्यांनाही सूट मिळेल. विद्यार्थी, शिक्षणाच्या आड त्यांनी कर बुडवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. कर न भरणाऱ्यांच्या मालमत्तांची जप्ती आणि लिलाव अटळ असल्याचा पुनरुच्चार जी. श्रीकांत यांनी केला.
ऑनलाइन कर भरला तरच सूट
एप्रिल ते जून या तीन महिन्यांत कर भरणाऱ्यांना मनपा सूट देत होती. १ एप्रिलपासून तीन महिन्यांत ऑनलाइन कर भरला तरच सूट मिळेल. एप्रिलमध्ये १० टक्के, मे महिन्यात ८, तर जून महिन्यात ६ टक्के सामान्य करात सूट मिळते.
माजी सैनिकांना कर माफी नाही
माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ होती. शासन निर्णयात मालमत्ता कराचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांना सामान्य कर लावला जाणार नाही. इतर कर द्यावे लागतील. पाणीपट्टी अजिबात माफ होणार नाही.
७ स्टार घरांना सवलत
मनपाने पहिल्यांदाच ७ स्टार योजना आणली आहे. यामध्ये १० टक्क्यांपर्यंत सुट मिळेल. घरात वृक्षारोपण असेल तर एक स्टार, ओला सुका कचरा १०० टक्के वेगळा केल्यास दुसरा स्टार, रेन वॉटर हार्वेस्टिंगला थ्री स्टार, सौर ऊर्जेचा वापर चौथे स्टार, घरात दुचाकी-चारचाकी ई-बाइक असेल तर पाचवे स्टार, मालमत्ता महिलेच्या नावाने असेल तर सहावे स्टार, १०० टक्के मालमत्ता कर-पाणीपट्टी भरली तर ७ वे स्टार मिळेल. ७ स्टारला करात १० टक्के, ६ स्टारला ८ तर ५ स्टार असलेल्या मालमत्तेला ६ टक्के करात सवलत असेल.