सिडकोकडून २ कोटी ७८ लाखाचा कर वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:17 PM2019-03-26T23:17:24+5:302019-03-26T23:17:34+5:30
सिडको वाळूज महानगर निवासी क्षेत्रातील मालमत्ता, पाणीपट्टी व सेवाकराची मार्च पर्यंत ९८ टक्के कराची वसूली करित जवळपास २ कोटी ७८ लाखाचा कर वसूल केला आहे.
वाळूज महानगर: सिडको वाळूज महानगर निवासी क्षेत्रातील मालमत्ता, पाणीपट्टी व सेवाकराची मार्च पर्यंत ९८ टक्के कराची वसूली करित जवळपास २ कोटी ७८ लाखाचा कर वसूल केला आहे. उर्वरित कर येत्या दोन-तीन दिवसात वसूल करुन शंभर टक्के कर वसूलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी दिली आहे.
सिडको वाळूज महानगरात ग्रोथ सेंटर व ग्रोथ सेंटर बाहेरील ७५ टक्यात असलेल्या मालमत्ताधारकांकडून कर वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाची पुर्तता करण्यासाठी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून कर वसूली मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेला मालमत्ताधारकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे सिडकोची मालमत्ता, पाणीपट्टी व सेवाकराची वसूली ९८ टक्यावर पोहचली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशासनाने ग्रोथ सेंटरमधील निवासी मालमत्ताधारकांकडून मालमत्ता व पाणीबीलापोटी आत्तापर्यंत २३ लाख ९९ हजार ९ रुपये. ग्रोथ सेंटर बाहेर ७५ टक्यात असलेल्या भूखंडधारकांकडून पाणीबीलापोटी १ कोटी ५१ लाख १२ हजार २८१ रुपये तर सेवाकरापोटी ३८ लाख ६९ हजार ७७४ रुपयाचा कर वसूल केला आहे. तसेच घनकचरा संकलन, साफसफाई, पथदिवे आदी सुविधासाठी आकारण्यात आलेल्या सेवा करापोटी ६३ लाख ९८ हजार ६४४ रुपये सेवाकर वसूल करण्यात आला आहे. चालू वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करत आत्तापर्यंत २ कोटी ७७ लाख ७९ हजार ७०८ रुपयाचा कर वसूल केला आहे. तसेच कराचा भरणा न करणाऱ्या व २० हजारापेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या ३७४ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. तर २० हजारापेक्षा कमी थकबाकी असलेल्या १६९३ मालमत्ताधारकांना प्रत्यक्ष भेटी देवून कर भरणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुपटीने कर वसूली वाढली ..
सिडको वाळूज महानगरातील मालमत्ताधारकांकडून मागील आर्थिक वर्षात मालमत्ता, पाणीपट्टी व सेवाकरापोटी प्रशासनाने जवळपास दीड कोटी रुपयाचा कर वसूल केला होता. मात्र यंदा आत्तापर्यंत पावणे तीन कोटी रुपये कराची वसूली करण्यात आली आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी दुपटीपेक्षा अधिक कर वसूलीत वाढ झाली आहे. कर वसूली वाढल्याने सिडको प्रशासनाला नागरी वसाहतीला सुविधा पुरविणे अधिक सोयीस्कर होणार आहे.