मराठवाड्यात करदाते वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:00 AM2018-02-09T00:00:36+5:302018-02-09T00:00:41+5:30
नवीन आर्थिक वर्षात मराठवाड्यातून दीड हजार कोटी रुपयांचा आयकर वसूल करण्यात येणार आहे. मागील वर्षभरात सव्वालाख नवीन आयकरदात्यांची संख्या वाढविण्यात विभागाला यश आले असल्याची माहिती मुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नवीन आर्थिक वर्षात मराठवाड्यातून दीड हजार कोटी रुपयांचा आयकर वसूल करण्यात येणार आहे. मागील वर्षभरात सव्वालाख नवीन आयकरदात्यांची संख्या वाढविण्यात विभागाला यश आले असल्याची माहिती मुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी येथे दिली.
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर मराठवाड्यातील आयकर विभागाच्या कार्याचा आढावा व अर्थसंकल्पाबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी असीमकुमार बुधवारी औरंगाबादेत आले होते. मागील दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी नाशिक येथे मुख्य आयकर आयुक्तपदाचे सूत्र स्वीकारले. नाशिक विभाग व मराठवाडा विभाग त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे. आज सकाळपासूनच छावणीतील आयकर विभागात मॅरेथॉन बैठका सुरूहोत्या. मराठवाड्यातील आयकर विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकांना हजर होते. विभागाचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. असीमकुमार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. जीडीपी वाढत
आहे.
नवीन आर्थिक वर्षासाठी नाशिक विभाग व औरंगाबाद विभाग मिळून ५८०० कोटींचे आयकर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात औरंगाबाद विभागाला दीड हजार कोटी रुपये आयकरातून वसूल करायचे आहे. यात टीडीएस वसुलीचाही समावेश आहे. मागील आर्थिक वर्षात मराठवाड्यात नवीन सव्वा कोटी आयकरदाते जोडल्या गेले असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव व के.पी.सी.राव यांची उपस्थिती होती.
आयकर विभागाचे दरवाजे खुले
प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी सांगितले की, आयकरसंदर्भात कोणाला काही समस्या असतील तर त्यांच्यासाठी आयकर विभागाचे दरवाजे केव्हाही खुले आहेत. आयकर भरण्यासंदर्भात अडचणी असतील तर थेट आयकर विभागात येऊन शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
देशाच्या उन्नतीसाठी आयकर वेळेवर भरा
मुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी आवाहन केले की, देशाच्या उन्नतीसाठी, येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करदात्यांनी कर वेळेवर भरणे आवश्यक आहे. तसेच करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आयकर विभागाच्या अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये करचुकवेगिरी करणारे बरोबर सापडल्या जातो. यामुळे कोणी गाफील राहू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
सेंट्रल अॅक्शन प्लॅन
नवीन आर्थिक वर्षात नवीन आयकर करदात्यांची संख्या वाढविणे व आयकराचे दीड हजार कोटींचे नवीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयकर विभागाच्या वतीने सेंट्रल अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती असीमकुमार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, याअंतर्गत पुढील तीन महिन्यांत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुका पातळीवर अधिकारी जाऊन जनजागृती करणार आहेत. तसेच करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.