पंढरपूर ग्रामपंचायतीकडे बजाज कंपनीने भरला ७ लाखांचा कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:23 PM2019-03-29T22:23:35+5:302019-03-29T22:23:50+5:30
पंढरपूर-वळदगाव ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर पंढरपूर ग्रामपंचायतीने बजाज आॅटो कंपनीकडे कर वसुलीसाठी पाठपुरावा केला होता.
वाळूज महानगर : पंढरपूर-वळदगाव ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर पंढरपूर ग्रामपंचायतीने बजाज आॅटो कंपनीकडे कर वसुलीसाठी पाठपुरावा केला होता. याला शुक्रवारी यश आले असून, बजाज आॅटो कंपनीकडून २० वर्षांनंतर कररुपी ७ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.
वळदगाव-पंढरपूर ही ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे बजाज आॅटोकडून कर दिला जात होता. मात्र, २० वर्षांपूर्वी विभाजन झाले आणि पंढरपूर व वळदगाव या स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन झाल्या. या विभाजनाची माहिती तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी बजाज कंपनीला दिली नाही. त्यामुळे बजाज आॅटोकडून वळदगाव ग्रामपंचायतीला कर दिला जात होता. दरम्यान, गतवर्षी पंढरपूरचे सरपंच शेख अख्तर यांनी कर भरणार करण्याबाबत बजाज कंपनीकडे पत्रव्यवहार केला.
तसेच सरपंच शेख अख्तर यांनी एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग , भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी विभागांकडे पाठपुरावा केला होता. यानंतर बजाज कंपनीच्या व्यवस्थापनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची १२ फेब्रुवारी रोजी बैठक झाली. मागणी करण्यात न आल्याने नियमानुसार वळदगाव ग्रामपंचायतीला कराचा भरणा करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंढरपूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात बजाज कंपनीची ११ हेक्टर १७ जमीन असून, कंपनीकडून या जमिनीवर बांधकाम केलेले नाही. या जागेपोटी कंपनीकडून या वर्षापासून पंढरपूर ग्रामपंचायतीला कर भरणा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार चालु वर्षाचा ६ लाख ७८ हजार २९४ रुपयांचा धनादेश कंपनीचे तान्हाजी सरडे यांनी शुक्रवारी सरपंच शेख अख्तर, उपसरपं महेंद्र खोतकर व पदाधिकाºयाकडे सुपूर्द केला.