रिक्षाचालकांच्या रांगेत टॅक्सीचालकांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:02 AM2021-06-09T04:02:16+5:302021-06-09T04:02:16+5:30
१५०० रुपयांच्या मदतीसाठी केले अर्ज कोरोना संकट : आरटीओ कार्यालयाने नाकारले अर्ज, कोरोनाने आणली अशीही वेळ संतोष हिरेमठ औरंगाबाद ...
१५०० रुपयांच्या मदतीसाठी केले अर्ज
कोरोना संकट : आरटीओ कार्यालयाने नाकारले अर्ज, कोरोनाने आणली अशीही वेळ
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना संकटकाळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, जिल्ह्यात त्यासाठी ८ हजार ४५९ रिक्षाचालकांनी अर्ज केले; परंतु या अर्जांमध्ये काही टॅक्सीचालकांचेही अर्ज आले. मात्र, ही बाब निदर्शनास आली आणि आरटीओ कार्यालयाने त्यांचे अर्ज नाकारले; पण कोरोनामुळे रिक्षाचालकांप्रमाणे टॅक्सीचालकांवरही आर्थिक संकट ओढावल्याचेच हे वास्तव आहे.
कोरोनासारख्या महामारीला गेल्या दीड वर्षापासून सामोरे जावे लागत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी निर्बंध लावण्यात आले. परिणामी, अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. रिक्षाचालक हा त्यातीलच एक वर्ग. औरंगाबाद जिल्ह्यात परवानाधारक रिक्षाचालकांना २० मेपासून दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अर्ज केलेल्या ८ हजार ४५९ रिक्षाचालकांपैकी जवळपास साडेसहा हजार रिक्षाचालकांना मदत मिळालेली आहे. यात मदतीच्या आशेने काही टॅक्सीचालकांनीही अर्ज केले; परंतु अर्जांच्या पडताळणीत ही बाब आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर आली. त्यांचे अर्ज नाकारण्यात आले. दीड हजार ही रक्कम फार मोठी नाही; परंतु या रकमेसाठी टॅक्सीचालकांनीही अर्ज करण्याची वेळ कोरोनाने आणली.
१,५५० अर्ज दुरुस्तीसाठी परत
प्राप्त झालेल्या रिक्षाचालकांच्या अर्जांपैकी ६ हजार ९०९ अर्ज आरटीओ कार्यालयाने मंजूर केले, तर १,५५० अर्ज दुरुस्तीसाठी परत करण्यात आले आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड देण्यात आल्यासह अन्य कारणांमुळे त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.
----
रिक्षाचालकांनी अर्ज करावे
कार, टॅक्सीचालकांनी अर्ज केले होते. त्यांचे हे अर्ज नाकारण्यात आले आहेत. आतापर्यंत साडेसहा हजार रिक्षाचालकांना अर्थसाह्य करण्यात आलेले आहे. या अर्थसाह्यासाठी पात्र रिक्षाचालकांच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या रिक्षाचालकांचे प्रमाण कमी आहे. जास्तीत जास्त परवानाधारक रिक्षाचालकांनी अर्ज करावा.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
-----
-अर्थसाह्यासाठी पात्र परवानाधारक रिक्षाचालक-२२,०००
-आतापर्यंत अर्ज केलेले रिक्षाचालक-८,४५९
- अर्थसाह्यासाठी अर्ज मंजूर-६,९०९