चहा विक्रेत्याच्या घरास राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 07:52 PM2019-03-01T19:52:05+5:302019-03-01T19:56:16+5:30
रस्त्याच्या निर्मितीसाठी मोठे मोठे दगड फोडण्यासाठी दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे भूसुरुंगाचे ब्लास्ट करण्यात आले.
- राम शिनगारे
औरंगाबाद : चहा विकून कमावलेल्या पैशांतून स्वप्नातील दोन खोल्यांचे पक्के घर बांधले. या घरापासून अवघ्या १५ मीटर अंतरावरून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम सुरूहोते. या रस्त्याच्या निर्मितीसाठी मोठे मोठे दगड फोडण्यासाठी दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे भूसुरुंगाचे ब्लास्ट करण्यात आले. यात चहा विकणाऱ्या युवकाच्या घराला तडे गेले. या घराची नुकसानभरपाई मिळण्यासाठी त्याने थेट विभागीय आयुक्तालयासमोर गुरुवारपासून (दि.२८) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ चे काम सुरू आहे. यातील माजलगाव ते केज या भागाचे काम दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे करण्यात येत आहे. याच रस्त्यावर धारूर तालुक्यातील चोरांबा गावातील अशोक मच्छिंद्र चव्हाण या युवकाचे घर आहे. आरणवाडी साठवण तलावामुळे बाह्यवळण रस्ता काढण्यात आला. त्यासाठी कंपनीतर्फे भूसुरुंगाच्या माध्यमातून दगड, खडक फोडण्यात आले. यात अशोकच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या दोन खोल्यांच्या घराला तडे गेले आहेत. यात न्याय मिळण्यासाठी तो १४ महिन्यांपासून विविध कार्यालयांत खेटे मारत आहे. त्याने घरात वडील नसल्यामुळे एकट्या आईला मदत करण्यासाठी पाचवीत असतानाच शिक्षण सोडून दिले. गावातील चहाच्या हॉटेलवर काम करून घर चालविले. पुढे स्वत:च चहाची टपरी टाकली. त्यातच काही वर्षांपासून घर सोडून गेलेले वडील परतले. चहाच्या टपरीतून मिळणाऱ्या पैशांतून शेतात दोन खोल्यांचे पक्के घर बांधले.
या शेतातून राष्ट्रीय महामार्ग गेला. या महामार्गाच्या निर्मितीसाठी मोठमोठे सुरुंगाचे स्फोट केले. यात कष्टातून बांधलेल्या घराला सर्व बाजंूनी तडे गेले. नियमानुसार या घराची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी रस्ते निर्माण करणाऱ्या कंपनीची आहे. अशोक चव्हाण याने धारूरचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, बीडचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे न्याय मागितला. मात्र, कोणीही त्याची दखल घेत नव्हते. दोन वेळा धारूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. आत्मदहनाचा इशारा दिला. प्रत्येकवेळी आश्वासनावरच बोळवण करण्यात आली. कंपनीने एका वेळा १०० रुपयांच्या बाँडवर घराच्या नुकसानभरपाईपोटी ३ तीन लाख रुपये चेकद्वारे देण्यात येतील, असेही लिहून दिले. यासही सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरी त्या युवकास पैसे देण्यात येत नाही.
उलट त्याच्या हॉटेलवर जाऊन कंपनीने पाळलेले गावगुंड त्रास देत आहे. एकुलता एक असल्याचे सांगून वडिलांना धमकावले जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एकवेळा १० ते १२ गुंड प्रवृत्तीच्या मुलांना सोबत आणून त्याला मारहाणही केली. याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी त्यालाच उचलून नेत तीन वर्षे कारागृहात सडविण्याची धमकी दिली. तरीही हार मानली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना अशोक चव्हाण याने सांगितले.
सुनील केंद्रेकरांकडून न्यायाची आशा
विभागीय आयुक्तपदी सुनील केंदे्रकर यांची नियुक्ती होताच त्याला न्याय मिळण्याची आशा वाटली. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना सुनील केंद्रेकर यांनी धडाकेबाज कामगिरी केली होती. त्याच्या चहाच्या टपरीवर पेपर येतात. त्यातून त्याने केंद्रेकरांच्या कामाविषयी ऐकले होते. लोकांची चर्चा सतत होत होती. ते लक्षात ठेवून आपल्याला न्याय मिळेल. या आशेने त्याने आयुक्तालय गाठले. आठ दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. त्यानंतर गुरुवारपासून (दि.२८) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पहिल्याच दिवशी विभागीय आयुक्तालयाकडून दखल
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विभागीय आयुक्तालयातील पुनर्वसन उपायुक्तांनी दखल घेतली आहे. या अन्यायाशी संबंधित राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांना तातडीचे पत्र पाठवून यावर तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाची प्रत उपोषणकर्त्याला सायंकाळी देण्यात आली.