आगामी निवडणुकीत सरकारला धडा शिकवा -छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:19 AM2018-12-25T00:19:19+5:302018-12-25T00:20:14+5:30
वैजापूरच्या मेळाव्यात केंद्र व राज्य सरकारवर टीका
वैजापूर : न्याय मागितला तर तुरुंगात टाकणारे हे सरकार आहे. देशात मंदिर, मशीद व राज्यात मराठा-ओबीसींंमध्ये फूट पाडून त्यांना मते मिळवायची आहेत. अच्छे दिनची भाषा करून शेतकरी, सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन समता परिषदेचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी वैजापूर येथे केले.
सोमवारी येथील जि. प. शाळेच्या मैदानावर आयोजित समता मेळावा व बहुजन परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला समता सैनिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भुजबळ यांच्या हस्ते विषमता निर्माण करणाºया मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांनी मनुस्मृतीवर टीका करत आताही देशात एक प्रकारे मनुवृत्ती जागी झाली असून उसळी मारत आहे. समतेचे चक्र उलटे फिरत असल्याचे सांगितले.
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी समतेचा संदेश दिला. फुले, शाहू, आंबेडकरांनी विज्ञानाची कास धरण्यास सांगितले; पण आज संभाजी भिडेसारखी माणसं संतती होण्यासाठी आंबे खाण्याचा सल्ला देतात. कायद्याचा आज संकोच होतोय असे सांगत त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर चौफेर फटकेबाजी केली.
साठ वर्षांच्या लढाईनंतर ओबीसींना २७ टक्के आरक्षण मंडल आयोगामुळे मिळाले; पण आता मराठा आरक्षणामुळे या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जनगणना करा, अशी मागणी त्यांनी केली. मांजरपाडा भागात डोंगरावर पडणारे पाणी गुजरातमध्ये जात असल्याने हे पाणी बोगदा करून मराठवाड्यात वळवण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
मोदींची नक्कल
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे भाषण केले होते. त्या भाषणात मोदींनी महाराष्ट्रातील शेतकºयांना कांदा व कापूस या पिकांबद्दल कसे आश्वासन दिले होते, याची हुबेहुब नक्कल भुजबळ यांनी करून दाखविली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हंशा पिकला. हे लोक हनुमानाची जात काढत आहेत. तेव्हा उद्या ३३ कोटी देवांच्या जाती ठरवून वर्गवारी करावी लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.