विद्यार्थीनीना 'पोर्न क्लिप' दाखवणाऱ्या शिक्षकाला अखेर ठोकल्या बेड्या; शाळेनेही केले निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:29 PM2020-02-06T12:29:17+5:302020-02-06T12:33:13+5:30
शाळा व्यवस्थापनाकडून आरोपी शिक्षकावर निलंबनाची कारवाई
औरंगाबाद : शाळेतील तीन विद्यार्थिनींना मोबाईलमधील अश्लील छायाचित्रे आणि अश्लील क्लिप दाखविणारा शिक्षक किरण कैलास परदेशी (४०, रा. वाडकर टॉवर, शिवाजीनगर, सिडको) याला अखेर सिडको पोलिसांनी बुधवारी (दि.५) सकाळी बेड्या ठोकल्या. शाळा व्यवस्थापनाने शिक्षक परदेशीला तडकाफडकी निलंबित केले.
सिडको एन-७ मधील शाळेत शिकणाऱ्या सातवीतील तीन विद्यार्थिनींना आरोपी किरण परदेशी याने त्याच्या मोबाईलमधील अश्लील छायाचित्रे आणि सेक्स क्लीप बळजबरी दाखविली होती. एवढेच नव्हे तर गृहपाठ, अभ्यासाच्या नावाखाली त्याने एका विद्यार्थिनीस तिच्या छातीची मापे मोजण्यास सांगितले होते. वर्गशिक्षकाच्या या कुकृत्याने प्रचंड घाबरलेल्या विद्यार्थिनींनी ही माहिती लगेच कुणालाही सांगितली नाही. शिक्षक परदेशी हा जेव्हा त्या वर्गावर शिकवायला जाई तेव्हा त्या तीन मुली त्याच्यापासून दूर राहत असल्याचे तेथील शिक्षकांच्या निदर्शनास आले. काहीतरी गडबड असल्याचे महिला शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर ६ जानेवारी रोजी त्यांनी या विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा तिन्ही मुलींना रडू कोसळले. वर्गशिक्षक परदेशीने त्यांना अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लीप दाखविल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी आॅगस्ट महिन्यात त्याने हे कृत्य केले. वर्गशिक्षक असल्याने मुली घाबरल्या व त्यांनी याविषयी वाच्यता केली नसल्याचे सांगितले.
पोलीस आयुक्तांना काही दिवसांपूर्वी प्राप्त झालेल्या अर्जाची चौकशी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक वर्षाराणी आजले आणि कर्मचाऱ्यांनी केली. या चौकशीत शिक्षकाच्या या कुकृत्यावरचा पडदा हटला. याप्रकरणी मंगळवारी (दि.४) आरोपी परदेशीविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अटकेच्या भीतीपोटी आरोपी किरण परदेशी पसार झाला होता. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा पाटील आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला दि. ७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस निरीक्षक गिरी यांनी दिली.
‘त्या’ शिक्षकाला पोलीस कोठडी
विद्यार्थिनींना जबरदस्ती अश्लील चित्रफीत दाखविणारा शिक्षक किरण परदेशी याला बुधवारी (दि.५) विशेष न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर के ले असता सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला की, प्रकरण गंभीर असून, तपास प्राथमिक अवस्थेत आहे. आरोपीने यापूर्वी असे प्रकार कधी व कुठे केले, किती जणांना त्याने त्रास दिला आणि या प्रकरणामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, आदी बाबींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
अगोदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
आरोपी शिक्षक किरण परदेशी याचे नातेवाईक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. किरणच्या या घाणेरड्या कृत्याचा जानेवारी महिन्यात पर्दाफाश झाल्यानंतर त्याच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्याऐवजी मुख्याध्यापकाने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. किरणविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळताच शाळा प्रशासनाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
मुख्याध्यापकांना घेराव
विद्यार्थिनींना क्लिप दाखविणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि रिपाइं (खरात) विद्यार्थी आघाडीतर्फे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश परदेशी यांना घेराव घातला. शिक्षकाने आॅगस्टमध्ये हे कृत्य केले. त्याच्यावर कारवाई का केली नाही, असा जाब विचारला. आंदोलनात छाया जंगले, वीणा खरे, रेखा राऊत, मनीष नरवडे, अंंकुश साबळे, अभिजित वाघमारे, आदींनी सहभाग घेतला.