बदल्यांच्या आदेशासाठी शिक्षक ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:38 AM2017-11-04T00:38:09+5:302017-11-04T00:38:18+5:30
सर्व संवर्गाच्या शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येणार असल्याचे सांगितल्याने शिक्षकांनी हिंगोली येथे सर्व शिक्षा अभियानच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ताटकळत बसल्यानंतरही कोणताच आदेश हाती न पडल्याने दुचाकीवरून आलेले शिक्षक कुडकुडत आपल्या गावाकडे निघाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सर्व संवर्गाच्या शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येणार असल्याचे सांगितल्याने शिक्षकांनी हिंगोली येथे सर्व शिक्षा अभियानच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ताटकळत बसल्यानंतरही कोणताच आदेश हाती न पडल्याने दुचाकीवरून आलेले शिक्षक कुडकुडत आपल्या गावाकडे निघाले होते.
शिक्षक संवर्ग १ व २ च्या २0५ च्या अगोदरच बदल्या झालेल्या आहेत. संवर्ग ३ व ४ च्या १८८३ जणांचे अर्ज काही दिवसांपूर्वी भरून घेतले होते. त्यातील काही दिवस तर दिवाळीत गेले. काही शिक्षकांनी दिवाळीतही सायबर कॅफेमध्ये मुक्काम ठोकून हा अर्ज भरण्याची कवायत केली. यातही पाच दिवस तर सर्व्हरच बंद होते. त्यानंतर ते सुरू झाले तरीही अर्ज अपलोड होत नव्हते. शिक्षकांनी आठ-आठ तास एकाच जागी ताटकळत बसून अर्ज भरले. तरीही अनेक शिक्षकांचे अर्ज भरायचे राहूनच गेले होते. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली होती. विशेष म्हणजे शिक्षकांकडून सक्तीने अर्ज भरून घेण्यात आले. शिक्षण विभागाकडूनही यासाठी तगादा लावला जात होता. तर कॅफेवर जवळपास हजार रुपयांचा फटका सोसावा लागला. या सर्व प्रकारात शिक्षकांची मोठी दैना झाली. आता शिक्षकांची यातून सुटका होईल, आज बदल्यांचे आदेश हाती पडतील, या आशेने तीनशे ते चारशे शिक्षक सर्व शिक्षा अभियानाच्या कक्षासमोर जमले होते. जि.प.मैदानावर यात मोठी गर्दी झाली होती. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी डी.के. इंगोले, बीईओ नांदे, माने, थोरात आदी हजर होते. मात्र आदेश काही आले नव्हते.