नोकरीच्या आमिष्याने शिक्षिकेची २२ लाखाची फसवणूक; संस्थाचालक म्हस्के पिता-पुत्राला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:13 PM2020-10-21T17:13:19+5:302020-10-21T17:19:17+5:30
नोकरी मिळेल या भाबड्या आशेने मनीषा कुलकर्णी यांनी नातेवाईकांकडून उसनवारी करीत दिले पैसे
औरंगाबाद : शिक्षिकेची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संस्थाचालक पिता-पुत्रांनी एका अबलेकडून तब्बल २२ लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली. याप्रकरणी तिने नवदुर्गेचे रूप धारण करून पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार सिडको पोलिसांनी जनार्दन म्हस्के व राहुल म्हस्के या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव मनीषा जनार्दन कुलकर्णी (३५, रा. नवजीवन कॉलनी, हडको) असे आहे. कुलकर्णी यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी थेट तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचे कार्यालय गाठले व आपबीती कथन केली. आयुक्तांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. कुलकर्णी यांना नूतन कनिष्ठ महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी व शंभर टक्के वेतन देण्याचे आमिष दाखवून संस्थेचे अध्यक्ष जनार्दन म्हस्के, मुलगा सचिव राहुल म्हस्के, मुलगी मंगल रतन वाघ व जावई प्राचार्य रतन वाघ यांनी २२ लाख रुपये घेऊन तात्पुरते नियुक्तीपत्र दिले व रुजू करून घेताना चार-पाच महिन्यांत कायमस्वरूपी नोकरीचा आदेश व शंभर टक्के वेतन सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले.
मात्र, ते आश्वासन पूर्ण न करता ५ डिसेंबर २०१९ रोजी कुलकर्णी यांनी कायमस्वरूपी अप्रुव्हलची मागणी केली असता संस्थाचालकांनी जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर कुलकर्णी यांनी न्यायालयात धाव घेतली. तेव्हा या चारही संस्थाचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यालयाने फेटाळला. त्यानंतरही सिडको पोलिसांनी आरोपींना अभय दिले. त्यानंतर कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर आरोपींच्या अटकेचे आदेश निघाले.
शिक्षिकेने टप्प्याटप्प्याने दिले पैसे
नोकरी मिळेल या भाबड्या आशेने मनीषा कुलकर्णी यांनी नातेवाईकांकडून उसनवारी करीत ५ जून २०१५ रोजी १५ लाख रुपये, नंतर ६ लाख ५० हजार रुपये, १७ डिसेंबर २०१६ रोजी धनादेशाद्वारे ५ लाख रुपये व १० एप्रिल २०१८ रोजी १ लाख ५० हजार रुपये, असे २२ लाख रुपये दिले.