आंतरजिल्हा बदलीनंतर गुरुजींची शाळेकडे पाठ, नोटिसा बजावायच्या कोणाला !
By विजय सरवदे | Published: October 8, 2022 07:06 PM2022-10-08T19:06:01+5:302022-10-08T19:09:26+5:30
पदस्थापनेनंतर शाळेला दांडी मारल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे
- विजय सरवदे
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ६३ शिक्षकांना जि. प. प्रशासनाने समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिल्या. मात्र, यापैकी सुमारे ३० शिक्षकांना गैरसोयीच्या शाळा मिळाल्यामुळे ते अद्याप नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेच नाहीत. त्यामुळे आता प्रशासनाने त्यांना नोटिसा काढल्या आहेत; परंतु ते शाळेत जात नाहीत. कुठे राहतात, त्याचा ठावठिकाणा नाही. त्यांना नोटिसा तरी बजावाव्या कुठे, असा मोठा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
आंतरजिल्हा बदलीचे आदेश २४ ऑगस्ट रोजी ऑनलाइन निर्गमित झाले. या जिल्हा परिषदेच्या शाळांतील १६८ शिक्षक बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेले. मात्र, दुसऱ्या जिल्ह्यातून १४९ शिक्षक या जिल्ह्यात येणार होते; परंतु आतापर्यंत अवघे ६३ शिक्षक शिक्षण विभागात रुजू झाले. त्यांना २१ सप्टेंबर रोजी समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आल्या. मात्र, अनेकांना गैरसोयीच्या शाळांमध्ये पदस्थापना मिळाली. अनेकांच्या पती-पत्नीची फाटाफूट झाली. पतीला एका तालुक्यात, तर पत्नीला ६०-७० किमी दूर दुसऱ्या तालुक्यात पदस्थापना मिळाली. त्यामुळे ६३ पैकी जवळपास ३० शिक्षक पदस्थापना मिळालेल्या ठिकाणी रुजूच झाले नाहीत. त्यांना पदस्थापना बदलून हवी आहे.
वीस दिवसांचा कालावधी झाला तरी नियुक्त शाळांवर शिक्षक रुजू न झाल्यामुळे शिक्षण विभागाने आता त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत; पण त्या बजावण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एक तर ते शाळेवर जात नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापक अथवा गटशिक्षणाधिकारी त्या शिक्षकांपर्यंत नोटीस पोहोचवू शकत नाहीत. दुसरीकडे, ते कुठे राहतात, त्याचा पत्ताही प्रशासनाकडे नाही.
८६ शिक्षकांची प्रतीक्षाच
आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर येथून १६८ शिक्षक तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. बदलीने दुसऱ्या जिल्ह्यांतून १४९ शिक्षक येणार होते; परंतु आतापर्यंत अवघे ६३ शिक्षक येथे रुजू झाले आहेत. उर्वरित ८६ शिक्षक अद्यापही जिल्हा परिषदेत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे येथील जि. प. शाळांमध्ये गुरुजींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. एका शिक्षकाला सध्या अनेक वर्गांचा भार सांभाळावा लागत आहे. १० टक्क़्यांपेक्षा जास्त रिक्त जागा असतील, तर शिक्षकाला कार्यमुक्त करू नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे कदाचित हे शिक्षक आलेले नसावे, अशी सूत्रांची माहिती आहे.