रेल्वेखाली शिक्षकाचा मृत्यू; अपघात की आत्महत्या? कारण अस्पष्ट
By राम शिनगारे | Published: April 9, 2023 09:05 PM2023-04-09T21:05:24+5:302023-04-09T21:05:31+5:30
शिवाजीनगर परिसरातील घटना, जवाहरनगर ठाण्यात नोंद
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा धावत्या रेल्वेच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे फाटक परिसरात घडली. ही आत्महत्या आहे की, अपघातात मृत्यू हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
रामानंद आनंदराव दरबेसवार (५२, रा. ज्ञानेश्वरनगर, शहानूरवाडी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरबेसवार हे दौलताबाद परिसरातील रामपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जातो, असे सांगून ते घराबाहेर पडले. रेल्वे रुळावरून जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसची त्यांना जोराची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे दृश्य पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींनी पाहिल्यानंतर त्यांनी जवाहरनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरबेसवार यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास जवाहरनगर पोलिस करीत आहेत.
पत्नी शिक्षिका, तर मुलगी डॉक्टर
रामानंद दरबेसवार यांच्या पत्नीही जिल्हा परिषदेच्याच शिक्षिका आहेत. त्यांची मुलगी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याशिवाय एक मुलगा हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करीत आहे. आर्थिकसह इतर प्रकारचे स्थैर्य असताना दरबेसवार यांनी आत्महत्या केली की, रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. याचा उलगडा झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.