‘भीक मांगो’ आंदोलनाने शिक्षक ‘दीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:25 AM2018-09-06T00:25:16+5:302018-09-06T00:25:56+5:30

शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या सन्मानाचा, आनंदाचा, मान-सन्मान स्वीकारण्याचा दिवस. या दिवशी शिक्षकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक प्रत्येक पातळीवर करण्यात येते; मात्र विविध प्रश्नांबाबत न्याय मिळत नसल्यामुळे शिक्षक दिनीच शिक्षक सरकारचा निषेध करीत रस्त्यावर उतरले.

Teacher 'Din' movement | ‘भीक मांगो’ आंदोलनाने शिक्षक ‘दीन’

‘भीक मांगो’ आंदोलनाने शिक्षक ‘दीन’

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादेत सरकारचा निषेध : मानसन्मान स्वीकारण्याच्या दिवशीच रस्त्यावर येण्याची वेळ; विविध शिक्षक संघटना आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या सन्मानाचा, आनंदाचा, मान-सन्मान स्वीकारण्याचा दिवस. या दिवशी शिक्षकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक प्रत्येक पातळीवर करण्यात येते; मात्र विविध प्रश्नांबाबत न्याय मिळत नसल्यामुळे शिक्षक दिनीच शिक्षक सरकारचा निषेध करीत रस्त्यावर उतरले. जिल्हा परिषद शिक्षक मराठवाडा कृती समितीतर्फे विभागीय आयुक्तालयासमोर धरणे धरण्यात आली. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी अनुदानाच्या मागणीसाठी क्रांतीचौकात ‘भीक मांगो’ आंदोलन केले, तर डी.टी.एड., बी.एड.च्या बेरोजगार विद्यार्थ्यांनी जि. प.समोर दिवसभर उपोषण केले. शहरात एकीकडे जिल्हा परिषद, महापालिका, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांकडून शिक्षकांचा सत्कार, सन्मान होत असताना दुसरीकडे विविध शिक्षक संघटना न्यायासाठी रस्त्यावर उतरल्या असल्याचे चित्र दिसून आले.
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढल्यानंतर त्यांच्या अनुदानासाठी मूल्यांकन करण्यात आले. परंतु शासन काही ना काही त्रुटी काढून राज्यातील हजारो शिक्षकांना अनुदानापासून वंचित ठेवत आहे. या निषेधार्थ शिक्षकांनी क्रांतीचौकात भीक मांगो आंदोलन केले. यात जमा झालेले ३१०० रुपये राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहेत.
५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ हा दिवस शिक्षकांच्या हक्काचा, आनंदाचा दिवस असतो. या दिवशी शिक्षकांना विशेष मानसन्मान दिला जातो. मात्र मागील अनेक वर्षांपासून विनावेतन अध्यापनाचे कार्य करत असलेल्या शिक्षकांना वेतन मंजूर केले जात नाही. त्यांची अवस्था ‘दीन’ बनली आहे. वेतनाअभावी त्यांना कुटुंबातून व समाजातून पावलो-पावली अपमानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर व अध्यापनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना सरकार याची दखल घेत नाही. याच्या निषेधार्थ क्रांतीचौकात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यात विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. यात प्रा. मनोज पाटील, पी. एम. पवार, आशा नारळे, संजय चव्हाण, विजय शिंदे, रामेश्वर साळुंके, सुनील कोतकर, महेश उबाळे, महेश पाटील, रोहित पाटील, तुकाराम जाधव, अंबरसिंग जारवाल, आरके आनंद, सुनील गोरे, विष्णू सुरसे, अरुण राठोड, जाहेद पटेल, ए. पी. पाटील, सिद्धार्थ कुलकर्णी, सोनाली नवपुते, अनिता पाटील, नमिता सावंत, स्वाती लोमटे, सोनाली देशमुख, साधना दंडे, शुभांगी शिंदे, पूनम वळसे, दीप्ती हजारे, शीतल हुकूम, स्वाती उगले, शीतल आरकांद, प्रियंका चव्हाण आदी उपस्थित होते.

शिक्षक कृती समितीचे विभागीय आयुक्तालयावर धरणे
राज्य सरकारने राबविलेल्या जि. प. शाळांच्या शिक्षक बदली धोरणात प्रचंड प्रमाणात अनियमितता आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही. बदल्यांमध्ये शेकडो शिक्षकांवर अन्याय झाला आहे. यात बनावट माहिती भरून बदली करून घेणाऱ्यांवर कारवाई करीत विस्थापिताना न्याय देण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील जिल्हा परिषद शिक्षक कृती समितीतर्फे विभागीय आयुक्तालयावर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठवाडा जिल्हा परिषद शिक्षक कृती समितीतर्फे शिक्षक दिनी जि. प. शिक्षकांनी विराट धरणे आंदोलन केले. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शिक्षकांनी एकूण १८ मागण्या केल्या आहेत. शिक्षकांनी अन्याय्य बदली धोरण, त्याची अंमलबजावणी करणाºया शिक्षण विभागाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाला शिक्षक भारती आणि शिक्षक सेनेने पाठिंबा दिला होता. निमंत्रक दिलीप ढाकणे, समन्वयक राजेश पवार, संतोष ताठे, सदानंद माडेवार, उद्धव बोचरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी संतोष अंबुलगेकर, तस्लीम शेख, सुषमा खरे, सुरेखा पाथ्रीकर, कल्पना काळे, पठाण यास्मीन, वीणा कदम, नितीन पवार, बालाजी माने, प्रमोद केसरावीकर, रंगनाथ राठोड, चंद्रकांत कुणके, सुहास मुळे, मधुकर बुरुपल्ले, राजेश कुरमुडे, अमोल कुलकर्णी, रामेश्वर पानकर, सुनील काचमांडे आदी उपस्थित होते.
बेरोजगार डी.टी.एड. पात्रताधारकांचे उपोषण
राज्यात आठ वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे. जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात येत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन संघटनेतर्फे जि.प.समोर उपोषण करण्यात आले.
याशिवाय खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येऊ नये, याद्वारे जि.प.च्या शाळांमधील रिक्त जागांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण होत आहे. याचा गुणवत्ताधारक आणि भावी शिक्षकांवर मोठा परिणाम होणार आहे. संस्थाचालकांनी सदर नियुक्त्या बेकायदेशीर करून वेळोवेळी शासनावर दबाव टाकून केलेल्या आहेत, त्यामुळे समायोजनाचा निर्णय तात्काळ थांबविण्याची मागणीही निवेदनाद्वारे संघटनेने केली आहे. या उपोषणात संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर, अमोल दांडगे, प्रशांत शिंदे पाटील, परमेश्वर इंगोले पाटील, संतोष चव्हाण, दीपक वानखेडे, अनिल वीर, दीपक बहिर, सुरेश सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Teacher 'Din' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.