शालेय शिक्षणमंत्र्यांच्या शुभेच्छापत्राने भारावले शिक्षक
By Admin | Published: September 8, 2014 12:20 AM2014-09-08T00:20:24+5:302014-09-08T00:34:12+5:30
औरंगाबाद : शहरातील शिक्षकांना शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सुखद धक्का दिला. त्यांनी दिलेल्या शुभेच्छापत्राने शिक्षक भारावून गेले आहेत़
औरंगाबाद : शहरातील शिक्षकांना शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सुखद धक्का दिला. त्यांनी दिलेल्या शुभेच्छापत्राने शिक्षक भारावून गेले आहेत़
शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शालेय, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना शुभेच्छापत्र लिहून सुखद धक्का दिला़‘आजचा शिक्षक स्वयंप्रकाशी असला तरच उद्याचा दिवस उजळ असेल,’ असा संदेश देत शिक्षणमंत्र्यांनी ज्ञानदानाचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले आहे़
५ सप्टेंबर माजी राष्ट्रपती डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो़ शालेय शिक्षणमंत्री दर्डा यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांना पत्र पाठविली़
मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये पत्र लिहून ते ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांना देण्यात आले़ शिक्षक दिनानिमित्त जेव्हा खुद्द शिक्षणमंत्र्याचेच शुभेच्छापत्र आले, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षकांतून उमटली़ राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडून आलेले पत्र संपूर्ण गावाला वाचून दाखविताना आपण शिक्षक असल्याचा अभिमान होत असल्याचे अनेकांनी नमूद केले.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी यापूर्वी राज्यातील दहावी, बारावीच्या ७ हजार ६२३ गुणवंत विद्यार्थ्यांना अभिनंदनाचे पत्र लिहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती़ तसाच उपक्रम शिक्षकांसाठी राबवून शहरातील ६ हजार ५०० च्या वर शिक्षकांना शुभेच्छापत्र लिहिले आहे़ शिक्षणमंत्र्यांनी शुभेच्छापत्राद्वारे शिक्षकांशी संवाद साधला असून त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मित्र बनण्याचा सल्ला दिला़
काय लिहिले पत्रात?
शिक्षक हा माणूस घडवितो आणि पर्यायाने समाज़ माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असला, तरी त्याचे विद्यार्थीपण जागवत ते टिकवून ठेवण्याची कला तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता़ त्यांच्या रूपाने देशाचे भवितव्य तुमच्या हाती असते आणि या भविष्याला आकार देण्याचे उदात्त काम तुम्ही करता़ या विद्यार्थ्यांना ज्ञानवंत आणि गुणवंत बनवायचे; पण त्यासोबत विज्ञानाची दृष्टी देत विवेकाचीही जोड द्या़ कारण या देशाच्या महान परंपरेचा प्रवाह अखंडित राहील़ आजचा शिक्षक स्वयंप्रकाशी असला तरच उद्याचा दिवस उजळ असेल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुभेच्छापत्रात लिहिले आहे़