शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता दिवाळीनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:41 AM2017-09-29T00:41:34+5:302017-09-29T00:41:34+5:30
आंतर जिल्हा शिक्षकांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत असून बदलीपात्र शिक्षकांची प्रतिक्षा वाढली आहे़ यावर्षीचे अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले असले तरी शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, आंतर जिल्हा शिक्षकांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़
राज्य शासनाने यावर्षी आॅनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया पार पडण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला आहे़ काही जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्या तरी नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत़ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्षणी आॅनलाईन बदल्यांचे आदेश मिळण्याची प्रतिक्षा करण्यात येत आहे़ जिल्ह्यातील २१५ गावे अवघड क्षेत्रात समाविष्ठ आहेत़ २० जूननंतरच शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार होती़ परंतु त्यानंतर अनेक तांत्रिक अडचणीमुळे बदल्यांची प्रक्रिया मंदावली होती़ जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संख्या ७ हजार ७५८ असून पदवीधर शिक्षकांची संख्या साडेसातशे आहे़ मुख्याध्यापकांची संख्या ५४३ आहे़ प्राथमिक शिक्षकांच्या सवंर्ग १, २ व ३ याप्रमाणे बदल्या होणार आहेत़ त्यामध्ये पती- पत्नी एकत्रिकरण, आजारी, सर्वसाधारण या प्रमाणे सर्व बदलीपात्र शिक्षकांची माहिती पोर्टलद्वारे शासनास आॅनलाईन पाठविण्यात आली आहे़ विशेष संवर्ग शिक्षक भाग -१ मध्ये पक्षाघाताने आजारी कर्मचारी, अपंग कर्मचारी, ºहदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, जन्मापासून एकच किडनी असलेले शिक्षक, कर्करोगाने आजारी, आजी, माजी सैनिक व अर्धसैनिक जवारांच्या पत्नी, विधवा, विधवा कर्मचारी, कुमारिका, परित्यक्ता, घटस्फोटीत महिला व वयाची ५३ वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी़ विशेष संवर्ग २ मध्ये पती, पत्नी एकत्रिकरण व १० वर्ष पूर्ण झालेले शिक्षक बदलीसाठी पात्र राहणार आहेत़
दरम्यान, शासनाच्या या निर्णयाविरूद्ध काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत़ या याचिकांच्या व शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा करण्यातच मागील काही महिन्यापासून शिक्षकांचा वेळ गेला आहे़ त्यामुळे बदलीसाठी पात्र असलेल्या काही शिक्षकांची मानसिकता शैक्षणिक वातावरणात रमण्यास तयार नाही़ याचा परिणाम संबंधित शाळेवर होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा प्रश्न निर्माण झाला आहे़