शिक्षक आई-वडील वेळ देत नाहीत, वाढदिवसाच्या दिवशीच मुलीने मैत्रिणीसह सोडले घर
By राम शिनगारे | Published: March 1, 2023 06:40 PM2023-03-01T18:40:26+5:302023-03-01T18:40:48+5:30
एमआयडीसी सिडको ठाण्तयात अपहरणाचा गुन्हा दाखल होताच १८ तासांत पोलिसांनी काढले शोधून
छत्रपती संभाजीनगर : शिक्षक आई-वडील घरात वेळ देत नाहीत. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशीच १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने दोन मैत्रिणींना सोबत घेत खास फिरायला जाण्यासाठी घर सोडले. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चिकलठाणा परिसरात घडला. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविल्यानंतर १८ तासांच्या आत मुलींचा शोध घेतल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक असलेल्या दाम्पत्याची १३ वर्षांची मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेते. तिच्यासोबत सर्वसामान्य कामगारांच्या १२ वर्षे वयाच्या दोन मुलीही सातवीतच शिक्षण घेतात. त्या तिघी वर्गमैत्रिणी आहेत. शिक्षकाच्या मुलीचा मंगळवारी वाढदिवस होता. आई-वडील वेळ देत नाहीत, बाहेर फिरायला घेऊन जात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्याचाच कंटाळा आला. त्यामुळे आपणच कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, असा प्लॅन शिक्षकाच्या मुलीने बनवला. तिघींपैकी एक मुलगी फिरायला जाण्यासाठी तत्काळ तयार झाली. एक तयार नव्हती. तेव्हा दोघींनी तिला शपथ घातली. त्यामुळे तिसरीही तयार झाली.
तिघींनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घर सोडले. चिकलठाणा परिसरातूनच ऑटोरिक्षात बसून रेल्वेस्थानक गाठले. तिन्ही मुली आठ वाजण्याच्या सुमारास मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वेत बसल्या. मनमाडला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उतरल्या. त्यांनी रेल्वे स्थानकावरच रात्र काढली. रात्रीतून त्यांचा विचार बदलला. बुधवारी सकाळीच छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेत बसल्या. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या रेल्वे स्थानकात पाेहोचल्या. तेथून पुन्हा ऑटोरिक्षातुन चिकलठाणा परिसरात आल्या. त्याच परिसरात पोलिस सीसीटीव्हीची तपासणी करीत असताना त्यांना त्या दिसल्या. या मुलींनी मनमाडला जाताना आणि येतानाही रेल्वेचे तिकीट काढले नव्हते. शिक्षक वडिलांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिघींच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. मुली सापडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर बाल न्यायमंडळासमोर हजर केल्यानंतर संबंधितांचा ताबा पालकांकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.