संस्थेने निलंबित केल्यामुळे शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:01 AM2019-03-07T00:01:56+5:302019-03-07T00:02:24+5:30
शायनिंग स्टार या मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकाला संस्थाचालकाने निलंबित केले. या शाळेच्या चौकशीला विलंब होत असल्यामुळे शिक्षक मुकीम महेबूब पटेल यांनी बुधवारी सकाळी जि.प.त विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. मुकीम पटेल यांना घाटीत दाखल केले. या प्रकारामुळे जि.प.त खळबळ उडाली.
औरंगाबाद : शायनिंग स्टार या मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकाला संस्थाचालकाने निलंबित केले. या शाळेच्या चौकशीला विलंब होत असल्यामुळे शिक्षक मुकीम महेबूब पटेल यांनी बुधवारी सकाळी जि.प.त विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. मुकीम पटेल यांना घाटीत दाखल केले. या प्रकारामुळे जि.प.त खळबळ उडाली.
खडकेश्वर येथील शायनिंग स्टार मराठी प्राथमिक शाळा व आझाद अली शाह शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या चार शाळांची विभागीय चौकशी करावी, सेवेत सामावून घ्यावे, यासाठी मुकीम पटेल यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी (दि.६) आत्महत्या करण्याचा इशारा देणारे निवेदन दिले होते. यानुसार पोलिसांनी जि.प.मध्ये बंदोबस्त लावला होता. शिक्षक मुकीम पटेल हे कुटुंबियांसोबत अचानक रिक्षातून आले. त्यांनी रिक्षा थेट मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या दालनाकडे आणली. त्याठिकाणी तैनात पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यामुळे त्यांनी धाव घेतली. मुकीम पटेल यांनी खिशातून विषाची बाटली काढली. विष घेत असतानाच पोलिसांनी बाटली फेकून देऊन त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा एकच धावपळ सुरू झाली. कुटुंबियांनी रडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ज्या रिक्षामधून मुकीम पटेल आले होते, त्याच रिक्षातून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी त्या शिक्षकाची भेट घेतली. शिक्षकाने मागणी केलेल्या संस्थेच्या चार शाळांची चौकशी गटशिक्षणाधिकाºयातर्फे केली आहे. याविषयीचा अहवाल येत्या दोन दिवसात मिळेल. त्यात संबंधित शाळांमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली. मुकीम पटेल यांना संस्था प्रशासनाने तोंडी आदेशाने निलंबित केलेले आहे. याविरोधात त्यांनी शाळा न्यायाधिकरणामध्ये दाद मागितली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे संस्था प्रशासनाला शिक्षणाधिकारी कार्यालयात कोणत्याही सूचना देऊ शकत नसल्याचे जैस्वाल यांनी स्पष्ट केले.
-------------