शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती नाही; शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले सुधारित आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 07:05 PM2020-06-24T19:05:25+5:302020-06-24T19:05:56+5:30
प्रभाव लोकमतचा : सोमवारपासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी पैठण यांनी व्हाट्सएप द्वारे तालुक्यातील शिक्षकांना दिल्या होत्या.
पैठण : शाळा पूर्वतयारीची कामे पूर्ण झाली असल्यास शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सक्ती करू नये असे सुधारित आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी आज काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी पैठण यांनी व्हाट्सएपवर संदेश देत शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याबाबत आदेश बजावले होते. या बाबत शिक्षकसेनेने आक्षेप घेतला तर लोकमतने सविस्तर वृत्त दि २३ जून रोजी प्रकाशित केले होते. लोकमत वृत्ताची दखल घेत शिक्षणाधिकारी यांनी सुधारीत आदेश काढल्याने शिक्षक सेनेने लोकमतचे आभार मानले आहेत
सोमवार पासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी पैठण यांनी व्हाट्सएप द्वारे तालुक्यातील शिक्षकांना दिल्या होत्या. व्हाट्सएप वरील या आदेशाने शिक्षक वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला होता, स्पष्ट लेखी आदेश जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत शिक्षकांनी शाळेत हजर होऊ नये असे आवाहन शिक्षक सेनेने केले होते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्य स्तरावर ऑनलाईन शिक्षण चालू ठेवून शाळा प्रत्यक्ष बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पैठण तालुक्यातील बहुतेक शिक्षक हे औरंगाबाद शहरातून ग्रामीण भागात ये-जा करत असतात.अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांना अचानक शाळेत बोलावल्याने ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे जोपर्यंत स्पष्ट आदेश प्रशासन देत नाही, तोपर्यंत शिक्षकांनी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याचे आवाहन शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आले होते. या बाबत लोकमतच्या दि २३ रोजीच्या अंकात बातमी प्रकाशित करून वास्तव परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला होता.
लोकमतच्या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी २१ जून रोजी काढलेल्या संदिग्ध पत्राबाबत शाळा पूर्वतयारीची कामे पूर्ण झाली असल्यास शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणेबाबत सक्ती करू नये असे आदेश दिले. शिक्षकांच्या उपस्थिती बाबतची संदिग्धता दूर केल्याबद्दल शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हा प्रसिद्धिप्रमुख महेश लबडे, तालुकाप्रमुख अमोल एरंडे, कैलास मिसाळ, अमोलराज शेळके, पांडुरंग गोर्डे, अजिनाथ दहिफळे, युनूस शेख, शिवाजी दुधे, देविदास फुंदे, लक्ष्मण गलांडे, मोहन घरगणे, उद्धव बडे, संदीपान बेडदे, भाग्यश्री मुरकुटे, सुनीता पवार, सुनीता दरे, अर्चना संकपाळ, माया गुगळे, आदींनी लोकमत व शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात पसरू नये म्हणून शिक्षकांनी शाळा पूर्वतयारीची कामे पूर्ण झाल्यास घरी राहून ऑनलाइन पध्दतीने मुलांना शिक्षण द्यावे, त्यासाठी सक्तीने शाळेत उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट आदेश दिल्याने शिक्षकांच्या उपस्थितीबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. 'दैनिक लोकमत' नी या प्रश्नास वाचा फोडल्याबद्दल आभार.
- अमोल एरंडे, तालुकाप्रमुख शिक्षक सेना पैठण