Teachers Day 2018 : ...वाचा काय आहे फिल्मी गुरुजींचा 'गुरुमंत्र'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 06:45 PM2018-09-05T18:45:17+5:302018-09-05T18:49:36+5:30
वाचा चित्रपटात कलावंतांच्या गाजलेल्या काही भूमिका आणि त्यांचा 'गुरुमंत्र'...
औरंगाबाद : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्म दिन. 'शिक्षक दिन' म्हणून तो साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्वजण आपल्या गुरूंचे स्मरण करत आहेत. आपल्या जीवनातील गुरु आपल्याला कायम प्रोत्साहन देत असतात. यासोबतच काही कलावंतानीसुद्धा चित्रपटात केलेल्या शिक्षकाच्या भूमिका अशाच प्रेरणादायी आहेत. यामुळेच या भूमिका आणि ते कलाकार असे समीकरणच झाले आहे. वाचा अशाच गाजलेल्या काही भूमिका आणि त्यातील गुरूने दिलेला 'गुरुमंत्र'....
ज्ञानाचा नफा अखेरच्या क्षणापर्यंत
ज्ञान ही एकमेव अशी गुंतवणूक आहे, ज्याचा नफा अखेरच्या क्षणापर्यंत मिळतो. सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी घर, कपडे, अन्न याशिवाय कुठली गोष्ट अत्यावश्यक असेल तर ते शिक्षण आहे. तुमच्याजवळ पैसा आहे. तो आपण सोन्यामध्ये गुंतवू शकतो. पैसा काय किंवा सोने काय, चोरी होण्याचे भय कायम असते. हाच पैसा ज्ञानामध्ये गुंतविला तर तो कमी होत नाही आणि चोरीही होण्याची भीती राहत नाही.
- अमिताभ बच्चन (एका कार्यक्रमात)
'वेळ' तुमच्याकडून कोणी हिरावून घेणार नाही
तुमच्याजवळ ७० मिनिटे आहेत, जी आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आहेत. आज तुम्ही चांगले खेळा वा वाईट, ही ७० मिनिटे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. जा मन भरून खेळा. कारण येणाऱ्या आयुष्यात काही चांगले होईल; अथवा होणारही नाही. हारा वा जिंका. काही झाले तरी ही ७० मिनिटे तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कोणीच नाही. या सामन्यात कसे खेळायचे हे मी सांगणार नाही. ते तुम्ही सांगायचे आहे, प्रत्यक्षात खेळ करून.
- शाहरूख खान (चक दे इंडिया)
प्रत्येकामध्ये स्वत:चा गुण असतो
बाहेर मनं जळालेल्या माणसांची दुनिया वसली आहे. प्रत्येकाला आपल्या घरात टॉपर्स हवे आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, एमबीबीएसपेक्षा कमी कोणालाच चालत नाही. ९५.२ टक्के, ९५.३ टक्के, ९५.७ टक्के यापेक्षा कमी गुण म्हणजे गुन्हाच. असे का? प्रत्येकामध्ये स्वत:चा गुण असतो. त्याची आवड असते. आम्ही स्वत:च्या आवडीखातर त्याचे करिअर ताणत राहतो. अगदी तुटेपर्यंत ते ताणत राहतो.
- आमिर खान (तारे जमीं पर)
कामगार निर्माण करायचे आहेत का?
आपण काय विद्यार्थ्यांना फक्त २१ अपेक्षित, बे एके बे, सीओटू, एचटूओ एवढेच शिकवायचे? परीक्षेतील मार्क बॅगेत घालून सिलिकॉन व्हॅलीला जाणारे कामगार निर्माण करायचे आहेत का? शिक्षणामध्ये जगण्याचे साधे साधे प्रश्न कसे सोडवायचे किंवा या असंख्य गरीब मुलांनी कष्ट करताना स्वाभिमानाने कसे उभे राहायचे, याचे शिक्षण असणारच नाही का?
- अतुल कुलकर्णी (दहावी फ)