शिक्षक दिन : बारावीत असतानाही शिक्षक काठीने मारायचे : रवींद्रकुमार सिंगल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 04:45 PM2019-09-05T16:45:32+5:302019-09-05T16:46:56+5:30

प्राथमिक शिक्षणापासून अभियांत्रिकीच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे येथे पोहोचलो

Teacher's Day: Even when it is twelfth, teachers hit the sticks: RavindraKumar Singal | शिक्षक दिन : बारावीत असतानाही शिक्षक काठीने मारायचे : रवींद्रकुमार सिंगल 

शिक्षक दिन : बारावीत असतानाही शिक्षक काठीने मारायचे : रवींद्रकुमार सिंगल 

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षा केल्यास शिक्षकांनाच वाईट वाटायचे...खाकी वर्दीचे आकर्षण घरातून...

औरंगाबाद : पहिलीपासून ते अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण हे दिल्लीतील शासकीय शाळा, उच्च माध्यमिक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. या शाळांमध्ये शिक्षकांनी केलेले संस्कार कामी आले. आज औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करताना या संस्कारांची मदत होते. आमचे चुकले असेल, सांगितलेले काही ऐकले नसेल, तर शिक्षक मोठी शिक्षा देत. त्या शिक्षेवर कधीही कोणत्याही पालकाने आक्षेप घेतला नाही; पण आता तसे होत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यास शिक्षकांना बंदी घातली जाते. वेळप्रसंगी शिक्षकांनी जर शिक्षा केलीच तर त्यांना अडचणी निर्माण केल्या जातात. हा काळ बदलाचा परिणाम आहे.

आम्ही पाचवीत असताना कालरा नावाच्या शिक्षकाने एका विद्यार्थ्याला काठीने मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने त्याच शिक्षकाला विद्यार्थ्यास शिक्षा केल्याचे खूप वाईट वाटले.  हे सगळे तुमच्यासाठीच सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा विद्यार्थी घडावेत हीच इच्छा होती. त्यासाठी तळमळही असे. तेव्हा ट्यूशन वगैरे असले काही प्रकार नव्हते. जे काही शिकवले जायचे ते वर्गात. त्यामुळे प्रत्येक तासाला खूप महत्त्व होते. कोणत्याही विद्यार्थ्याला काही समजले नाही, तर त्यास पुन्हा शिक्षक समजावून सांगत. आताचे शिक्षकही चांगले आहेत; पण ट्यूशन लावण्याचे फॅड पालकांमध्येच अधिक आले आहे. त्यास आता तरी काही पर्याय आहे, असे वाटत नाही.

शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अभियंता बनलो...
पूर्वी नीट,सीईटीसारख्या परीक्षा नव्हत्या. १२ वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ विषयाच्या गुणांवरच अभियांत्रिकीला प्रवेश मिळत होता. या विषयांमध्ये गुण मिळविण्यासाठी शिक्षकांनी दिलेल्या टिप्समुळेच यश मिळाले. दिल्लीतीलच दिल्ली कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. केवळ शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे हे यश गाठता आले. शाळेत असतानाही शिक्षक नेहमी भविष्यातील करिअरविषयी मार्गदर्शन करायचे. यातून वेगवेगळ्या वाटा समजल्या. शासकीय शाळात असतानाही अतिशय कडक नियम होते. हे नियम पाळणे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक होते. त्यामुळे आज जे काही आहे, ते सर्व शालेय, महाविद्यालयीन जीवनात शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळेच आहे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे अतिशय गरजेचे असतात. माझ्यावर संस्कार झाल्यामुळे ते मुलांमध्येही पाहायला मिळतात. माझ्या मुलांनाही कधीच ट्यूशन लावले नाही. केवळ सेल्फ स्टडीच्या आधारावर त्यांनी यश मिळवले. हे सर्वांकडून अपेक्षित आहे.

खाकी वर्दीचे आकर्षण घरातून...
दिल्लीतील पोलीस लाईनमध्ये वडील डीसीपी होते. माझा जन्म पोलीस कॉलनीतच झाला. त्याठिकाणाहूनच सगळे शिक्षण झाले. त्यामुळे पहिल्यापासून खाकी वर्दीची ओळख होती, आकर्षण होते. अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर काही दिवस खाजगी क्षेत्रात नोकरी केली. त्यानंतर शासकीय नोकरीत आलो; पण खाकीच्या आकर्षणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली. त्यात यशही लवकरच मिळाले.

( शब्दांकन : राम शिनगारे )

Web Title: Teacher's Day: Even when it is twelfth, teachers hit the sticks: RavindraKumar Singal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.