‘विनाअनुदानित’वरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची शिक्षकांची याचिका नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:37 PM2019-04-06T23:37:17+5:302019-04-06T23:37:17+5:30
‘विनाअनुदानित’ तुकड्यांवरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अरुण ढवळे यांनी नामंजूर केली.
औरंगाबाद : ‘विनाअनुदानित’ तुकड्यांवरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अरुण ढवळे यांनी नामंजूर केली.
२८ जून २०१६ च्या परिपत्रकानुसार बदली करण्याचा हक्क व्यवस्थापनाला आहे; परंतु शिक्षकांना तसा हक्क नाही, असे स्पष्ट करीत खंडपीठाने याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका नामंजूर केली.
यासंदर्भात जालना येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ संचलित श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयातील प्रदीप राठोड आणि इतर ८ शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या शाळेत अनुदानित आणि विनाअनुदानित तुकड्या आहेत. २८ जून २०१६ च्या परिपत्रकानुसार विनाअनुदानित तुकड्यांवरून अनुदानित तुकड्यांवर बदली करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.
याचिकाकर्त्यांच्या विनंतीला व्यवस्थापनातर्फे विरोध करताना अॅड. विवेक ढगे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २८ जून २०१६ चे ‘परिपत्रक’ आहे, ‘शासन निर्णय’ नाही, म्हणून परिपत्रकातील तरतुदी व्यवस्थापनावर बंधनकारक नाहीत. बदली करावी किंवा नाही हा व्यवस्थापनाचा हक्कआहे. बदल हा कर्मचाऱ्यांचा हक्क होऊ शकत नाही. शिवाय सदर संस्था ही अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे राज्यघटनेच्या कलम ३० नुसार व्यवस्थापन करताना व्यवस्थापनाला स्वायत्तता आहे. शिक्षकांच्या नेमणुका हा स्वायत्ततेचा भाग आहे. सुनावणीअंती खंडपीठाने याचिका नामंजूर केली.