मूकमोर्चातून शिक्षकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:32 PM2017-10-30T23:32:31+5:302017-10-30T23:33:13+5:30
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शिक्षकांच्या होत असलेल्या बदल्यांच्या पद्धती विरोधात जिल्ह्यातील १८ पेक्षा जास्त शिक्षक संघटनांनी सोमवारी एकत्र येत मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शिक्षकांच्या होत असलेल्या बदल्यांच्या पद्धती विरोधात जिल्ह्यातील १८ पेक्षा जास्त शिक्षक संघटनांनी सोमवारी एकत्र येत मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला. २७ फेब्रुवारीचा जी.आर. रद्द करावा, तसेच इतर मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
येथील जिल्हा क्रीडा संकुलापासून दुपारी एकच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी शिक्षिका होत्या. सहयोगनगर, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
त्यानंतर कमल लांडगे, संगीता चाटे, सुरेखा खेडकर, माया तेलंग, संगीता सपकाळ या शिक्षिकांनी सभेपुढे निवेदन केले, तर भगवान पवार, राजेंद्र खेडकर, सुनील कुर्लेकर, शेख मुसा, विजय समुद्रे, दिलीप डावकर, अनिल जाधवर, श्याम दामुर्डे, अंगद पिंगळे, अनिल विद्यागर, सचिन हंगे, हकीम मणियार, काझी मुशाहेद, मोमीन अलीमोद्दीन, शेख वजीर, सुरेखा खेडकर, माया तेलंग आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.
शिक्षकांचा मोर्चा शिस्तीत निघाला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वळण घेताना नगर रोडकडून येणारी वाहने थांबली. इकडे नको, तिकडे बसा, या गोंधळात वाहतुकीची कोंडी झाली होती.