शिक्षकांनो, सामाजिक विषयावर बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:23 AM2017-09-26T00:23:53+5:302017-09-26T00:23:53+5:30

आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

Teachers, talk about social issues | शिक्षकांनो, सामाजिक विषयावर बोला

शिक्षकांनो, सामाजिक विषयावर बोला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : साने गुरुजींची आठवण ६७ वर्षानंतरही काढली जाते. दुसरीकडे आज शिक्षक रजेवर गेल्यावर मुले टाळ्या वाजवितात कारण साने गुरुजींमध्ये शिक्षकाची जी ताकद होती ती आजच्या शिक्षकांमध्ये राहिलेली नाही. आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
सोमवारी सायंकाळी राजश्री शाहू महाविद्यालयात आयोजित ‘शिक्षणावर बोलू काही’ या अंतर्गत ते नागरिकांशी संवाद साधत होते. डॉ. सुरेश सावंत, व्यंकटेश चौधरी, शिवा कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकावर माझा अजूनही विश्वास आहे. या शिक्षकावरच समाजाकडूनही टीका होते. कारण अजूनही समाजाने शिक्षकांकडून अपेक्षा सोडलेली नाही. ठेकेदार, राजकारण्यांकडून समाजाला अपेक्षा उरलेली नाही. ज्या दिवशी शिक्षकावरील टीका थांबेल तो दिवस दुर्देवी असेल कारण त्या दिवशी समाजाने शिक्षकांकडूनही अपेक्षा सोडल्याचे समजावे. असे कुलकर्णी यावेळी म्हणाले. आज शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा अस्वस्थ करणारा आहे. इयत्ता १२ वी नंतरची मुले व्यवस्थेत टिकत नसल्याचे दिसते. ग्रामीण भागात फिरताना ही मुले खुशाल पत्ते पिटताना दिसतात. कारण या मुलांचे हात आपण कौशल्यपूर्ण घडवू शकलो नाही. सगळ्यांना व्यवहारिक ज्ञान देवू शकलो नाही. सगळ्यांनाच पास करत पुढे ढकलायचे असेल तर या शाळा हव्यात कशाला ? असा परखड सवालही हेरंब कुलकर्णी यांनी यावेळी केला.
मागील काही दिवसांपासून मी ग्रामीण भाग पिंजून काढतो आहे. आजवर १५ जिल्ह्यांत फिरुन ७० शाळा पाहिल्या़ या शाळातील अनेक मुलांना साधं लिहिता, वाचताही येत नाही. आपण टीव्ही पाहताना चॅनल सर्फिंग करीत असताना, मध्येच एखादे इतर भाषेतील चॅनल लागल्यानंतर तो बदलतो कारण तिथे काय सुरु आहे तेच आपल्याला समजत नसते. एखाद्या चॅनलवर आपण २ मिनिटे थांबू शकत नसू; तर लिहिता वाचता न येणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वर्ष-वर्ष शाळेतील काळ्या फळ्यासमोर का बसावे? लिहितावाचता येणारी मुलं कधीच शाळा सोडत नाहीत. मात्र ज्यांनी शिकायचे वय असताना शाळा सोडली त्या बाहेर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार कोण, असा सवालही कुलकर्णी यांनी केला.

Web Title: Teachers, talk about social issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.