जुन्या पेंशन योजनेसाठी शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:25 PM2019-09-05T18:25:32+5:302019-09-05T18:26:10+5:30
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिक्षकदिनी काळ्या फिती लाऊन निषेध
पैठण : देशभरात सर्वत्र शिक्षक दिन उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे पैठण येथील जि प प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंदांनी नवीन शिक्षकांना लागू असलेली अंशदायी पेंशन योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिक्षकदिनी काळ्या फिती लाऊन निषेध व्यक्त केला.
शिक्षकदिनीच शिक्षकांनी केलेल्या या आंदोलनामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नविन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. हि योजना बंद करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करित आज ५ सप्टेंबर रोजी पैठण जि प प्राथमिक शाळा क्र २ च्या शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
पैठण तालूक्यातील शिक्षक अशोक औटे, सचिन डमाळे, अमोल बनसोडे, संतोष बोंबले आदींचे आकस्मिक निधन झाले, या शिक्षकांना नविन पेन्शन लागू असल्याने या शिक्षकाच्या कुटुंबाला काहीच मिळाले नाही आज या शिक्षकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे. आमच्या पगारातूनच शासन १० टक्के पगार कपात करत असून याचा काही एक हिशोब देण्यात येत नाही असे या शिक्षकांचे म्हणने आहे. समान काम समान वेतनावर शासनाने आम्हाला नविन पेन्शन बंद करून जूनी पेन्शन चालू करावी अशी मागणी या वेळी उपस्थित शिक्षकांनी केली.
यावेळी शौकत पठाण, कुमार ढाकणे, जालिंदर शिरसाठ, अंबादास बोराडे, समशेर पठाण, लक्ष्मण गलांडे, तोतरे, प्रल्हाद पाखरे, अंकुश म्हस्के, अमोल बडे, राजेश पाखरे, सुधिर शिंदे, राहुल तांदळे ,श्रीमती संगीता आंधळे, श्रीमती नाझिया खान ,श्रीमती रोही शेख, श्रीमती यास्मिन शेख, श्रीमती शेख आदी शिक्षक उपस्थिती होते .