शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या दारी अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 07:15 PM2021-11-01T19:15:49+5:302021-11-01T19:15:59+5:30
त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचे अनुदान घोषित करण्याची मागणी शिक्षक समन्वय संघाने केली आहे.
औरंगाबाद -खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या २० टक्के अनुदान, २० टक्क्यांवरून ४० टक्के अनुदान करताना त्रुटींची सुनावणी शिक्षक आमदारांसमोर विभागनिहाय झाली. त्रुटी पूर्तता होऊन ९ महिने सरले, अद्याप शाळांचे अनुदान घोषित झाले नाही. त्यामुळे त्रुटीत अडकलेल्या शाळांच्या शिक्षकांनी आजपासून सिडकोतील शिक्षक आ. विक्रम काळे यांचे घर गाठून घरासमोर धरणे आंदोलन सुरू केले.
राज्य शासनाने १२, १५ व २४ फेब्रुवारी २०२१ रोजी शाळा अनुदान घोषित करण्यात आले. यात काही शाळांना २० टक्के अनुदान नव्याने तर काही शाळांना २० वरून ४० टक्के अनुदान सुरू करण्यात आले. यावेळी २० टक्के अनुदानावरील प्राथमिक व माध्यमिक शाळांना व नव्याने २० टक्के घेण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पात्र होऊन क्षुल्लक कारणांवरून अपात्र ठरवले गेले. त्या शाळांना ३० दिवसांची मुदत देऊन विभागनिहाय सुनावणी शिक्षक आ. काळे यांच्यासमोर झाली. तब्बल ९ महिन्यानंतरही त्रुटींची पूर्तता करुन ही अद्याप शाळांचे अनुदान घोषित झाले नाही. आ. काळे यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी शिक्षक समन्वय संघाचे के. पी. पाटील, दीपक कुलकर्णी, नेहा गवळी, गजानन काकड, अमोल हलगडे, एस बी वावरे, एस आर डोगराव यांच्यासह आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केली. यात औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होता.
आंदोलक आक्रमक...
राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांनी आंदोलकांचे आ. काळे यांच्याशी मोबाईलवरून बोलणे करून दिले. काळे यांनी बुधवारी पुण्यात भेटण्याचे आश्वासन देत शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवले. शिक्षक आमदारांच्या दारी दिवाळी साजरी करत असून त्यांनी दिवाळी द्यावी म्हणून शिक्षकांनी दुरडी घेऊन आ. काळे यांच्या घरासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत धरणे दिले. मंगळवारी सकाळी सुरु होणारे आंदोलन मागणी पूर्ण होईपर्यंत सुरू राहील, असे पाटील म्हणाले.