मुख्य अभियंत्याच्या चौकशीसाठी पथक
By Admin | Published: February 14, 2015 12:10 AM2015-02-14T00:10:55+5:302015-02-14T00:13:43+5:30
औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करा, असे आदेश राज्याच्या अवर सचिवांनी दिले
औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करा, असे आदेश राज्याच्या अवर सचिवांनी दिले होते. त्याप्रमाणे शिंदे यांच्या कार्यकाळातील कारभाराची मुंबईहून औरंगाबादेत दाखल झालेल्या तीन सदस्यीय समितीने चौकशी चालू केली आहे.
शिंदे यांच्या कार्यकाळात परिमंडलामध्ये अनेक कामे करण्यात आली. त्या कामांची आणि कामात केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी या मागणीविषयी राज्याचे अवर सचिव एस. एस. शिरसीकर यांना पत्राद्वारे कळविले होते. सचिवांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शिंदे यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. चौकशी समितीतील सदस्यांनी शुक्रवारी तक्रार केलेल्या नागरिकांचा जबाब नोंदविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी मे २०१३ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणीसाठी फेज-१ योजनेत अनेक कामे नियमबाह्य केल्याच्या तक्रारी आहेत, शहरात भूमिगत वायरिंगसाठी ड्रम प्रोजेक्ट राबविण्यात आला; पण तो यशस्वी झाला नाही. त्यात अफरातफर केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर आहे. जीटीएल आणि महावितरणमधील हस्तांतरण प्रक्रिया पारदर्शक झाली नाही आणि इतर लहान-मोठी कंत्राटे नियमबाह्य दिल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.