युवक महोत्सवासाठी २०७ महाविद्यालयांचे संघ सज्ज; २ हजार विद्यार्थी विद्यापीठात येणार
By योगेश पायघन | Published: October 14, 2022 09:00 PM2022-10-14T21:00:30+5:302022-10-14T21:00:52+5:30
रविवारी सकाळी साडेआठ ते अकरा वाजेदरम्यान शोभायात्रेने महोत्सवाची सुरूवात होईल.
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवाला रविवारी सुरूवात होत आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २०७ महाविद्यालयांनी संघांची नोंदणी केली. १२०० विद्यार्थीनी तसेच ८०० विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होण्याचा अंदाज असून त्यानुसार तयारी अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी दुपारनंतर काही संघ विद्यापीठात दाखल होतील. असे विद्यार्थी विकास संचालक डॉ.संजय सांभाळकर यांनी सांगितले.
रविवारी सकाळी साडेआठ ते अकरा वाजेदरम्यान शोभायात्रेने महोत्सवाची सुरूवात होईल. सकाळी अकरा वाजता. नाटयशास्त्र विभागाच्या प्रांगणात सृजन रंग हा मुख्य रंगमंच उभारण्यात आला आहे. या ठिकाणी उद्घाटन सोहळा होईल. लेखक, दिग्दर्शक अरिंवद जगताप यांच्या हस्ते व अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले असतील.
दुपारी दोन वाजेनंतर सातही स्टेजवर विविध कलाप्रकारांचे सादरीकरण नियोजित करण्यात आले आहे. रात्री दहा वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम मंगळवारपर्यंत आयोजित करण्यता आले आहे. समारोप व बक्षिस वितरण सोहळा अभिनेता भारत गणेशपुरे, सुहास सिरसाट यांच्या उपस्थितीत होईल. असे डाॅ. सांभाळकर यांनी सांगितले.
दिवसभर बैठक, आढावा सत्र
केंद्रीय युवक महोत्सव चार दिवसात सहा विभागात ३६ कला प्रकारात हा महोत्सव रंगणार असून सात रंगमंचाची उभारणी पुर्ण झाली आहे. युवक महोत्सवासाठी लोकरंग नाटयगृह पाकींग, नाटयरंग नाटयगृह, नादरंग मानसशास्त्र विभाग, नटरंग शिक्षक भवन प्रांगण, शब्दरंग संस्कृत विभाग व ललित रंग ललित कला विभाग हे सात रंगमंच उभारण्यात आले आहेत. या तयारीसाठी दिवसभर प्रकुलगुरू डाॅ. श्याम शिरसाट, कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांचे बैठक सत्र, आढावा शुक्रवारी सुरू होता. तर महोत्सवासाठी स्थापन विविध समित्या नियोजनात व्यस्त होत्या.