पाणावलेल्या डोळ्यांनी सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्जुन’, ‘भक्ती’ वाघांनी घेतला निरोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 12:36 PM2021-08-16T12:36:18+5:302021-08-16T13:12:33+5:30
१९८४ मध्ये महापालिकेने सर्वप्रथम चंदीगड येथील प्राणी संग्रहालयातून पिवळे वाघांच्या २ जोड्या आणल्या होत्या. अर्जुन आणि भक्ती ही त्यांची तिसरी पिढी आहे.
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या ( Siddhartha Garden ) प्राणी संग्रहालयातील पिवळ्या वाघाची ( Tiger ) जोडी शनिवारी रात्री पुणे येथील प्राणी संग्रहालयास रवाना करण्यात आली. सिद्धार्थ उद्यानात जन्मलेल्या सात वर्षीय अर्जुन, पाच वर्षीय भक्तीचे डोळे निरोपप्रसंगी पाणावले होते. मागील अनेक वर्षांपासून लहान मुलांप्रमाणे त्यांना प्रेम देणाऱ्या केअर टेकर मंडळींनाही दु:ख अनावर झाले होते.
सिद्धार्थ उद्यानात पिवळ्या वाघांची संख्या मागील काही वर्षांपासून वाढत आहे. वाघ ठेवण्यासाठी पुरेशी जागाही महापालिकेकडे सध्या नाही. जागा नसल्याने काही वाघांचा पाळणाही महापालिकेने लांबविला होता. मागील दोन वर्षांमध्ये वाघांची संख्या बऱ्यापैकी वाढली. सध्या प्राणी संग्रहालयात ११ पिवळे तर ३ पांढरे वाघ असे एकूण १४ वाघ आहेत. वाघांची संख्या अतिरिक्त झाल्यामुळे पुणे येथील प्राणी संग्रहालयास वाघाची जोडी देण्याचे आदेश केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने दिले. त्यानुसार महापालिकेने ‘अर्जुन’ आणि ‘भक्ती’ ही जोडी देण्याचा निर्णय मनपाने घेतला.
१९८४ मध्ये महापालिकेने सर्वप्रथम चंदीगड येथील प्राणी संग्रहालयातून पिवळे वाघांच्या २ जोड्या आणल्या होत्या. अर्जुन आणि भक्ती ही त्यांची तिसरी पिढी आहे. वाघाची जोडी पुणे येथे पाठविण्यासाठी वनविभाग औरंगाबाद यांच्याकडून परवाना प्राप्त झाला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पुणे येथील पथक शहरात दाखल झाले. त्यांनी सोबत येताना २ निलगायी आणल्या होत्या. महापालिकेला या निलगाय देण्यात आल्या. रात्री उशिरा अर्जुन आणि भक्तीला घेऊन पथक रवानाही झाले.