सीएमपी प्रणालीने केलेल्या पहिल्याच वेतनात तांत्रिक गोंधळ; काही शिक्षकांना मिळाले दोन पगार; अनेक जण वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:03 AM2021-06-19T04:03:57+5:302021-06-19T04:03:57+5:30
औरंगाबाद : शिक्षकांनी आग्रह धरलेल्या सीएमपी प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेने त्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन केले; मात्र यामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक ...
औरंगाबाद : शिक्षकांनी आग्रह धरलेल्या सीएमपी प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेने त्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन केले; मात्र यामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षकांच्या बँक खात्यात दोन वेतन जमा झाले तर अनेकांना वेतनच मिळाले नाही.
शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली या महिन्यापासून सुरू करण्यात आली. एप्रिल महिन्याचे रखडलेले शिक्षकांचे वेतन गुरुवारी करण्यात आले; मात्र तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या संख्येच्या शिक्षकांचे वेतन दोनदा जमा झाले. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनासाठी असलेले अनुदान संपले. परिणामी निम्मे शिक्षक वेतनाविनाच राहिले. ही बाब शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने सर्व शिक्षकांना मेसेज करून वेतन न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
एकच वेतन काढा...
वेतन अधीक्षक कार्यालयाकडून दोनदा दिले गेलेल्या वेतनातून अतिरिक्त वेतन परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हक्काचे असलेले एक वेतनच काढावे. दुबार जमा झालेले वेतन खात्यावरून काढू नये किंवा इतरत्र हलवून ठेवू नये. येत्या काळात ही प्रणाली टिकवायची असल्याने सर्व शिक्षकांनी बँकेला सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी केले आहे.