अभियांत्रिकीच्या अधोगतीस तंत्रशिक्षण विभाग देखील जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 04:44 PM2018-04-27T16:44:43+5:302018-04-27T16:47:29+5:30
अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे.
औरंगाबाद : अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाला स्वत:मध्ये बदल करावा लागेल. त्यासाठी उद्योगासोबतचा सहभाग महाविद्यालयांना वाढवावा लागणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका खाजगी कंपनीतर्फे शिष्यवृत्ती वाटप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर एमएसबीटीचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्राचार्य डॉ. एफ. ए. खान उपस्थित होते. डॉ. वाघ यांच्या हस्ते तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. वाघ म्हणाले, आज जवळपास पन्नास टक्के जागा तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये रिक्त राहत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यवस्थेत देखील सुसूत्रता आणण्याची गरज आहे. तंत्रशिक्षणाविषयी आणि अभियांत्रिकीविषयी नकारात्मकता निर्माण होत आहे. व्यवस्थेतील मरगळ झटकून काम करायला हवे, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करताना तुम्हाला काय करायचे आहे. कुठे काम करायचे आहे. याबाबत स्पष्ट असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक डॉ. सीमा बोर्डे, आभार एल. आय. शेख यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. आर. एन. खडसे, प्रा. पी. टी. काळे, प्रा. एच. आर. शेख, प्रा. मकरंद भागवत, प्रा. सुदीन कुलकर्णी, एम. आर. मघाडे, प्रा. आर. एन. बुरकुल, डॉ. आर. जी. वाडेकर, प्रा. जे. एस. पाटील, प्रा. जे. डब्ल्यू. नेमाडे, प्रा. एस. एस. रगटे आदींनी प्रयत्न केले.
महाविद्यालयास एनबीए आवश्यकच
पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाने एनबीए मानांकन करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही महाविद्यालयास यापुढे सुविधा दिल्या जाणार नाहीत, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.