दिव्यांगांच्या ई-रिक्षात तांत्रिक बिघाड, बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानाखाली काढला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 07:00 PM2024-08-08T19:00:29+5:302024-08-08T19:02:26+5:30
ई -रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याची तक्रार दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली.
छत्रपती संभाजीनगर: दिव्यांग महामंडळाच्या मार्फत दिलेल्या रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याने आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात दिव्यांगांनी तक्रार करताच आमदार कडू यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांचा उद्या छत्रपती संभाजीनगरात आक्रोश मोर्चा आहे. यासाठी आमदार कडू शहरात दाखल झाले आहेत. आज दुपारी त्यांनी विश्रामगृहात विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी काही दिव्यांगांनी दिव्यांग महामंडळाच्या मार्फत देण्यात आलेल्या ई- रिक्षा बाबत केलेल्या तक्रारीवरून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. ई -रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याची तक्रार दिव्यांगांनी आमदार कडू यांच्याकडे केली. यामुळे आमदार कडू यांनी ई - रिक्षा देणाऱ्या तेजस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दिव्यांगांनी आमदार कडू यांना संबंधित कंपनीचे कर्मचाऱ्यांच्या समोरच ई-रिक्षाबाबत तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. सदरील कंपनीने दिव्यांग महामंडळाच्या मार्फत दिलेल्या रिक्षात तांत्रिक बिघाड आहे. पहिल्याच दिवशी रिक्षा बंद पडल्या. रिक्षा चढावर चढत नाहीत. तसेच लवकर सुरू होत नाहीत. चेसीस आणि हँडल मध्ये बरंच अंतर आहे, रस्त्यामध्ये रिक्षा पलटी होत आहेत. कुठल्याही बॅलन्स नसल्यामुळे या रिक्षा अतिशय धोकादायक असल्याचे दिव्यांगांनी सांगितले. यामुळे आमदार कडू यांच्या रागाचा पारा चढला . यातच संबंधित अधिकाऱ्याने व्यवस्थित उत्तरं न दिल्यामुळे कडू यांनी त्याच्या थेट कानशिलात लगावली.
दिव्यांगांच्या ई - रिक्षात तांत्रिक बिघाड, बच्चू कडूंनी कंपनीच्या अधिकाऱ्याच्या कानाखाली काढला आवाज #ChhatrapatiSambhajinagarpic.twitter.com/Vt7rLthljz
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 8, 2024
प्रहारच्या आक्रोश मोर्चाला अद्याप परवानगी नाही
दिव्यांग, शेतकरी व शेतमजूर यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.