इंधनात इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारातच; जुन्या पद्धतीनेच होते पेट्रोलपंपांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:17 PM2018-02-01T13:17:11+5:302018-02-01T13:19:31+5:30
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची कुठलीही तांत्रिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारात आहे. जुन्या पद्धतीनेच इंधनाचे माप, घनता, पाणी, फिल्टर आणि दर तपासण्यात येत आहेत.
औरंगाबाद : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची कुठलीही तांत्रिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारात आहे. जुन्या पद्धतीनेच इंधनाचे माप, घनता, पाणी, फिल्टर आणि दर तपासण्यात येत आहेत. दर सर्वत्र सारखेच असल्यामुळे मापात पाप होत आहे काय, इंधनाची घनता कशी आहे, त्यात पाण्याची भेसळ आहे की नाही. फिल्टर केल्यानंतर इंधनाची गुणवत्ता कशी आहे. एवढ्याच मुद्यांचे पुरवठा विभाग जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार परीक्षण करून त्याचा अहवाल तयार करीत आहे.
शहरातील बहुतांश पेट्रोलपंपांवर दुचाकीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर त्यामध्ये पाणी निघण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे दुचाकी वाहने बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे पेट्रोलपंपचालकांनी देखील हात टेकल्याचे वक्तव्य करून कंपन्यांकडे बोट दाखविले. गेल्या आठवड्यात पुरवठा विभागाने अचानक ६ पंप तपासले. त्यापैकी एकाही पंपामध्ये भेसळ आढळून आलेली नाही. तसेच कुठेही इंधनात पाणी आढळून आले नाही.
टाक्या रोटेशननुसार स्वच्छ करतात
इंधनासाठी वापरण्यात येणार्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी त्याचे रोटेशन कंपनी प्रतिनिधी, वजनमापे विभाग, उपसा मशीन पुरवठा कंपनी प्रतिनिधी व मालकाच्या उपस्थितीत करावे लागते. रोटेशन ठरलेले असते. त्यातही डेडस्टॉक हा उपसल्या जात नाही. १० ते १२ वर्षांपूर्वी डेडस्टॉक विक्रीसाठी पुरवठा विभागाची परवानगी घेतली जायची. सद्य: पेट्रोलपंपांची संख्या वाढल्यामुळे परवानगी घेतली जात नाही.
पुरवठा अधिकार्यांचे मत असे -
पुरवठा अधिकारी डॉ.भारत कदम म्हणाले, पुरवठा विभागाला इंधनाचे माप, घनता, पाणी, फि ल्टर आणि दर तपासण्याचे अधिकार आहेत. इथेनॉल मिश्रण हे तांत्रिक बाब आहे. त्याच्या मिश्रणाबाबत पुरवठा विभागापर्यंत काहीही माहिती आलेली नाही. शिवाय हा केंद्र शासनाचा निर्णय आहे.
पेट्रोल कंपन्यांचे मुख्यालय तिकडेच असून, सेल्स आॅफिसरदेखील कंपनी मुख्यालयाच्या संपर्कात असतात. शहरी भागातच पेट्रोलमध्ये पाणी मिश्रण होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ग्रामीण भागातून आजवर एकही तक्रार आली नसल्याचा दावा कदम यांनी केला.
इथेनॉलचे पाणी होत असेल, तर सर्व पेट्रोलपंपांबाबत तक्रारी आल्या पाहिजेत. ग्राहकांमध्ये जागृती होणे अपेक्षित आहे. किमान दोन लिटर पेट्रोल घेऊन त्यांची पावती ग्राहकांनी घ्यावी. त्यानंतर जर वाहनातील इंधनात पाणी निघाले तर तक्रार करून संबंधित पंपचालकावर गुन्हा दाखल करता येईल.