लघूशंकेसाठी जाणाऱ्या तरूणाचा रॉडने मारहाण करून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 09:06 PM2019-11-11T21:06:12+5:302019-11-11T21:08:21+5:30
शेजाऱ्यांनी पत्र्याच्या शेडला धक्का लागल्याच्या कारणाने केला हल्ला
औरंगाबाद: शेजारील कुटुंबाच्या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान सोमवारी दुपारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही मारहाण बीडबायपासवरील बेंबडे हॉस्पिटलमागील वसाहतीत ९ नोव्हेंबर रोजी रात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास झाली होती. याविषयी आरोपी दोन महिलांसह तरूणाविरोधात सातारा ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
अनिल शिवदत्ता फुलमाळे(२६), अनिलची पत्नी सोनी फुलमाळे आणि आई मालन फुलमाळे (५५)अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष स्वामी गुढे( २७, रा.बीडबायपास)असे मृताचे नाव आहे. याविषयी सातारा पोलिसांनी सांगितले की, बायपासवरील एका रुग्णालयाच्या मागे संतोष गुढे हा तीन बहिणीसह पत्र्याचे शेडमध्ये राहात होता. त्यांच्या शेजारीच आरोपी अनिल, त्याची पत्नी आणि आईसह राहात होते. ९नोव्हेंबर रोजी रात्री संतोषने त्याच्या नातेवाईकासह जेवण केले आणि तो झोपला. रात्री दोन वाजेच्या सुमारास तो झोपेतून उठला आणि लघूशंकेसाठी जाऊ लागला.
तेव्हा घरोशेजारील फुलमाळे यांच्या पत्र्याच्या शेडच्या बल्लीला संतोषचा पाय लागला. यामुळे फुलमाळे दाम्पत्य झोपेतून उठले आणि त्यांनी संतोषला पकडले. तू मुद्दाम आमच्या घराच्या पत्र्याचे शेड पाडण्यासाठी लाकडी बल्लीला लाथ मारल्याचा आरोप करीत अनिल, त्याची पत्नी सोनी आणि आई यांनी त्याच्यावर रॉडने हल्ला चढविला. या मारहाणीत अनिल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. भांडणाच्या आवाजाने संतोषची आत्या गुरूबाई शेवाळे आणि बहिणी या मदतीला धावल्या आणि त्यांनी भांडण सोडविले. यानंतर त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत संतोषला घाटी रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून संतोष बेशुद्धावस्थेत उपचार घेत होता. दरम्यान संतोषचा उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताची आत्या गुरूबाई यांनी सातारा ठाण्यात आरोपी अनिल, सोनी आणि मालन फुलमाळे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला.
संशयितांना घेतले घनसावंगीतून ताब्यात
संतोषवर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक विक्रम वडणे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा ते घराला पळून गेल्याचे समजले. यानंतर दरम्यान आज संतोषचा मृत्यू झाल्याचे कळताच पोलिसांनी संशयित आरोपींना घनसावंगी(जि. जालना)येथून ताब्यात घेतल्याची माहिती निरीक्षक पोटे यांनी दिली.