खरं सांगा, शहरात पाणी कधी येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:51+5:302021-06-09T04:05:51+5:30
जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी ...
जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी
शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या
पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल.
ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल.
नवीन पाणीपुरवठा योजना : तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे आदेश
औरंगाबाद : शहराच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यास विद्यमान पाणीपुरवठा यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने २००८ मध्ये शहरासाठी समांतर जलवाहिनी योजना मंजूर केली होती. त्यानंतर आठ वर्षांनी समांतरने गाशा गुंडाळला. आता १६८० कोटी रुपयांच्या नव्या योजनेचे काम सुरू असून, ही योजना फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण होईल, असा दावा प्रशासन करते आहे. योजनेच्या घोषणा व गदारोळातच शहरवासीयांना एक तप चटके सहन करावे लागले. ही योजना पूर्ण होऊन किमान १६ वर्षांनी का होईना शहराला पुरेसे पाणी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
शहरातील अनेक वसाहतींना आजही आठव्या आणि नवव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये हे काम सुरू करण्यात आले. फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण काम संपेल असा दावा करण्यात येत आहे.
‘खरं सांगा शहरात पाणी कधी येईल’ या विषयावर ‘लोकमत’ने औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, महापालिकेतील योजनेचे समन्वयक अधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सर्वांनी योजना तीन वर्षांत पूर्ण होईल असा दावा केला आहे. नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण झाला तर शहराच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल.
सध्या शहराची गरज २०० एमएलडी पाण्याची आहे. १२० एमएलडी पाणी सध्या शहरात आणण्यात येते. पाणीपुरवठ्यात कोणतेही नियोजन नसल्यामुळे काही वसाहतींना पाचव्या दिवशी, तर काही वसाहतींना थेट नवव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. २०० पेक्षा अधिक वसाहतींना मागील दहा वर्षांपासून महापालिका टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम सध्या सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले आहे त्या कंपनीने युद्धपातळीवर कामाला सुरुवातही केली. ज्या ठिकाणी रस्त्याची कामे मनपाकडून करण्यात येणार आहेत तेथे प्राधान्याने ३३ किमीच्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. शहरात ११ ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे स्वरूप
२०५०-५२ पर्यंत औरंगाबादसह आसपासच्या खेड्यांची लोकसंख्या किमान ३५ ते ४० लाख होणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी योजनेचे डिझाइन तयार करण्यात आले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे.
ही योजना दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षांचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. नवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा, देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागाचा समावेश करण्यात आला आहे.
तीन वर्षांत योजना पूर्ण होणार
२०२४ पर्यंत योजना पूर्ण होईल त्या दृष्टीने सध्या काम सुरू आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार प्राधान्याने काही रस्त्यांवर जलवाहिन्या टाकण्यात येत आहे. नक्षत्रवाडी एमबीआरचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू करण्यात आले.
- अजय सिंग, मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
नियोजनानुसार आतापर्यंत काम सुरू
नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आतापर्यंत काम सुरू आहे. कामात कोणताही अडथळा नाही. फेब्रुवारी २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. योजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्यही करण्यात येत आहे.
हेमंत कोल्हे, समन्वयक, नवीन पाणीपुरवठा योजना