'आधी जात सांगा, मग मिळेल रेशन'; पुरोगामी महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 11:41 AM2021-08-04T11:41:01+5:302021-08-04T12:38:01+5:30
पुरोगामी महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य वितरणासाठी जात विचारली जाते. हे ‘जातीभेदाला’ खतपाणी घातल्यासारखेच म्हणावे लागेल.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : स्वस्त धान्य दुकानात तुम्ही गेल्यास धान्य देण्यापूर्वी तुमची जात विचारली जाते. त्यासाठी माहितीचा फॉर्म भरून दिल्यानंतरच मग धान्य दिले जाते. आपण २१व्या शतकात वावरताना अजूनही जात ही डोक्यातून जात नाही, हे दुर्दैव!
पुरोगामी महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य वितरणासाठी जात विचारली जाते. हे ‘जातीभेदाला’ खतपाणी घातल्यासारखेच म्हणावे लागेल. अलीकडे स्वस्त धान्य दुकानात एक फॉर्म भरून घेतला जातो. त्यास ‘स्वयंघोषणापत्र’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. त्या फॉर्ममधील प्रश्न शिधापत्रिकाधारकाला भरून द्यायचे आहेत. त्यात ४ प्रश्न असून प्रवर्ग ‘एससी’ (अनुसूचित जाती) ‘एसटी’ (अनुसूचित जमाती) व इतर असे लिहिण्यात आले आहे. स्वस्त धान्य वितरक जेव्हा हा फाॅर्म भरून घेतो तेव्हा तुम्ही ‘एससी’ आहात की ‘एसटी’ व पुढे तुमची जात कोणती, असे विचारणा केली जाते. त्यावेळी चारचौघांत थेट जात विचारल्यामुळे शिधापत्रिकाधारक संताप व्यक्त करत आहेत. अनेक स्वस्त धान्य दुकानात यामुळे वितरक व ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमकीदेखील घडत आहेत. आमची ‘जात’ विचारण्याचे धाडस होतेच कसे. आता ‘जात’ बघून तुम्ही धान्य देणार आहात का, असा संतप्त सवाल नागरिक स्वस्त धान्य खरेदीदारांना करत आहेत. एकीकडे शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला बळी पडणे व दुसरीकडे फॉर्म भरून घेण्यासाठी शासनाचा दबाव, यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे मात्र, ‘सँडविच’ होत आहे.
स्वयंघोषणापत्रावर सरकारचे नाव गायब
स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारकांकडून भरून घेतल्या जाणाऱ्या ‘स्वयंघोषणापत्रा’वर शासनाच्या नावाचा उल्लेख नाही. यात शिधापत्रिकाधारकाचे, कुटुंब प्रमुखाचे नाव, शिधापत्रिकेचा १२ अंकी क्रमांक, शिधापत्रिकेची योजना त्यात अंत्योदय अन्न योजना (एएव्ही), प्राधान्य कुटुंब योजना (पीएचएच), प्रवर्ग - एससी (अनुसूचित जाती), ‘एसटी’ (अनुसूचित जमाती), इतर, शिधापत्रिकेमधील एकूण सदस्यांची संख्या व एकूण सदस्यांपैकी दिव्यांग सदस्यांची संख्या अशी विचारणा करण्यात आली आहे.
लाभार्थींची जात विचारणे चुकीचे
स्वस्त धान्य दुकानदार हे शासकीय अधिकारी नाहीत. आम्ही फक्त सरकारी लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे काम करतो. मात्र, रेशनसाठी आलेल्या लाभार्थ्यांकडून ‘स्वयंघोषणापत्र’ भरून घेण्याचा शासनाकडून दबाव वाढत आहे. ‘तुमच्या सडलेल्या तांदूळ, गव्हासाठी आमची जात विचारता का’ असा संतप्त सवाल लाभार्थी विचारत आहे. त्यांच्या संतापाला वितरकाला सामोरे जावे लागत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे लाभार्थीची जात विचारणे चुकीचे आहे.
- डी.एन. पाटील, राज्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ