सत्य बोलल्याने व्यक्ती त्रस्त होऊ शकतो; पण पराभूत होत नाही : आचार्य महाश्रमणजी
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 9, 2024 11:27 AM2024-05-09T11:27:47+5:302024-05-09T11:30:44+5:30
आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या साक्षीने गोलवाडीत तेरापंथ भवनाचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : एकदा खोटे बोलले तर ते लपविण्यासाठी अनेकदा खोटे बोलावे लागते. सत्य बोलल्याने व्यक्ती त्रस्त होऊ शकतो; पण पराभूत होत नाही. अंतिमत: सत्याचा विजय होतो. यामुळे खोटे बोलू नका, नेहमी खरे बोला. सत्य, अहिंसा, प्रेमभाव, मानवताच जगात ‘शांती’ निर्माण करू शकते, असा सत्यवादी जीवन जगण्याचा मंत्र, जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे ११वे आचार्य महाश्रमणजी यांनी येथे दिला. आचार्य महाश्रमणजींसह ८१ साधू - संतांचे पदयात्रेने मंगळवारी गोलवाडीत आगमन होताच समाजातील अबालवृद्धांनी जयघोष करीत त्यांचे स्वागत केले. आचार्यश्रींच्या साक्षीने तेरापंथ भवनाचे लोकार्पण करण्यात आले.
यानिमित्त आयोजित धर्मसभेत सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, मौलाना हाफीज अन्सारी, बिशप एम. यू. कसाब, न्या. कैलासचंद कासलीवाल, वारकरी संप्रदायाचे आंधळे महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, विश्व हिंदू परिषदेचे राजीव जहागीरदार, सकल मारवाडी महासभेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरख, जेम्स अंबिलढगे, सकल जैन समाजाचे उपाध्यक्षांसह विविध व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते. प्रारंभी मुनीश्री दिनेशकुमारजी व साध्वी प्रमुखा विश्रुतविभाजी यांनी मार्गदर्शन केले.
तेरापंथ युवक परिषदेच्या वतीने आचार्य महाश्रमण दीक्षा कल्याण महोत्सव विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘आचार्यश्री महाश्रमणजी फक्त तेरापंथ धर्म संघाचे आचार्य नव्हे, तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे ते आचार्य आहेत’, असा उल्लेख राजेंद्र दर्डा यांनी केला. अवघ्या १११ दिवसांत तेरापंथ भवनची इमारत उभारल्याबद्दल आचार्यश्री महाश्रमण अक्षय्य तृतीया प्रवासव्यवस्था समितीचे अध्यक्ष सुभाष नहार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. भवन उभारण्यात सहकार्य लाभल्याबद्दल सुभाष नहार यांनी सर्वांचे आभार मानले. महावीर पाटणी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल नहार, सुनील राका, राजेंद्र डोसी, संजय सेठिया, महेंद्र सुराणा, कौशिक सुराणा, अंकुर लुणिया, राजकुमार बाठिया, तेरापंथ युवक परिषदेचे पदाधिकारी यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
विरोधकांवर खोटे आरोप करू नका
आचार्यश्री महाश्रमणजी यांचे दर्शन घेण्यासाठी लोकप्रतिनिधी धर्मसभेत आले होते. निवडणूक वातावरण लक्षात घेऊन आचार्यश्री म्हणाले की, प्रचारामध्ये विरोधकांवर आरोप करताना ‘खोटे’ आरोप करू नका. सत्यता असेल तरच आरोप करा. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल, आ. प्रशांत बंब, शिवसेनेचे (उबाठा) नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आचार्यश्रींचे आशीर्वाद घेतले.