तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:27 IST2025-03-07T13:27:02+5:302025-03-07T13:27:37+5:30
दौलताबादसह पाच ठिकाणी झाडेझुडपांसह गवताने पेट घेतला; तर नारेगावात पेटलेल्या कचऱ्याने दुकानाला आग लागली.

तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात दुपारनंतर शहरवासीयांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. याचा थेट परिणाम निसर्गावरही हाेत असून, शहरात दुपारी अवघ्या सहा तासांत सात ठिकाणी आग लागली. यात प्रामुख्याने दौलताबादसह पाच ठिकाणी झाडेझुडपांसह गवताने पेट घेतला; तर नारेगावात पेटलेल्या कचऱ्याने दुकानाला आग लागली.
बुधवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत एकीकडे हवामानात गारवा असताना गुरुवारी दुपारनंतर शहरात उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. चिकलठाणा वेधशाळेचे हवामान सहायक सुनील निकाळजे यांच्या माहितीनुसार, बुधवारी, गुरुवारी पश्चिम बंगालकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वातावरणावर परिणाम दिसून आल्याने रात्री पारा ६ अंशांनी घसरला होता. सकाळी ८ वाजेपर्यंत १२.४ अंश सेल्सिअस तापमान होते. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३५.६ अंश सेल्सिअस कमाल नोंद झाली. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात ३७ अंश सेल्सिअसपर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे.
कोकणवाडीत घर पेटले
गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजता कोकणवाडीच्या समाधान कॉलनीत रुग्णालयाच्या वरच राहणाऱ्या डॉ. दीपक लोहिया यांच्या घराला आग लागली. अग्निशमन अधिकारी दीपराज गंगावणे यांनी धाव घेत अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली. देवघरापासून आगीची सुरुवात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून कुटुंबाचे दोन लॅपटॉप, देवघरातील साहित्य, मसाज मशिन, वायर, साउंड सिस्टम, वायर जळून खाक झाले.
दुपारी १२ नंतर झाडी, गवतांना आग
- दुपारी १२ वाजता दौलताबादच्या अब्दिमंडईत झाडांना आग.
- १:३० वाजता हिमायत बागेतील मोठ्या परिसरातील गवताला आग.
- १:४५ मिनिटांनी विद्यापीठातील बुद्धलेणी परिसरात झाडांनी आग.
- २:१५ वाजता सिद्धार्थ उद्यानातील वाळलेल्या झाडांनी घेतला पेट.
- ३:२६ मिनिटांनी आरटीओ परिसरातील कचऱ्याला आग.
कचऱ्यामुळे दुकान पेटले
नारेगावात कचऱ्याने दुकानाला आग लागली. कैसर खान यांच्या दुकानाजवळील कचऱ्याने सुरुवातीला पेट घेतला. आग वाढत गेल्याने दुकानही पेटल्याचे अग्निशमन अधिकारी सोमिनाथ भोसले यांनी सांगितले.
चढउतार कायम
- यंदा ३ मार्च रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद.
- ६ मार्च रोजी रात्रीतून तापमान सात अंशांनी घसरणीमुळे गारवा जाणवला.
- गुरुवारी दिवसभरात कमाल ३५.६, तर किमान १२.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद.
- बुधवारी कमाल ३४.४, तर तापमान १९.४ अंश सेल्सिअस तापमान राहिले.