१ सप्टेंबरला मंदिर, तर २ तारखेला मशीद उघडणार; खासदार जलील यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 01:51 PM2020-08-27T13:51:20+5:302020-08-27T13:54:49+5:30
१ सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. हिंदू बांधवांनी स्वत: आपली धार्मिक स्थळे सुरू करावीत, असे आवाहन मी करीत आहे.
औरंगाबाद : राज्य शासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरले आहे. वैद्यकीय सेवा अधिक मजबूत करणे आणि नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात शासनाला यश आलेले नाही. कोरोनाचा संसर्ग मंदिर किंवा मशिदीतून होणार नाही तरी आतापर्यंत धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी हिंदू बांधव मंदिर उघडतील, तर २ सप्टेंबर रोजी आपण स्वत: मशीद उघडणार आहोत, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. दैनंदिन जीवनाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर येईल असे वाटले होते. मात्र राज्य शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे यातील कोणतीही गोष्ट राज्य शासनाला करता आली नाही. लग्नासाठी पूर्वी ५० जणांना परवानगी देण्यात येत होती, आता ती २०० पर्यंत वाढविण्यात आली. एसटी बस सुरू करण्यात आली. असे असताना कोरोना आजार फक्त मंदिर आणि मशिदीमधून वाढणार आहे का? याचे उत्तर राज्य शासनाने द्यावे, असे खा. जलील म्हणाले. १ सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. हिंदू बांधवांनी स्वत: आपली धार्मिक स्थळे सुरू करावीत, असे आवाहन मी करीत आहे. २ सप्टेंबरला मी स्वत: शहरातील शाहगंज येथील मशीद उघडणार आहे. शासनाच्या विरोधात जाऊन आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे. कारण आमचा नाईलाज आहे, असेही खा. जलील म्हणाले.
शासनाने अटी-शर्ती ठरवून द्याव्यात
मंदिर किंवा मशीद उघडण्यासाठी राज्य शासनाने नियमावली ठरवून द्यावी. एकाच वेळी ५० किंवा १०० जणांना प्रवेश देण्यात येईल, असे काहीतरी निश्चित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.