भरधाव टेम्पोने कामगारास चिरडले
By Admin | Published: October 9, 2016 12:46 AM2016-10-09T00:46:55+5:302016-10-09T01:08:14+5:30
वाळूज महानगर : सायकलवरून कंपनीत कामाला चाललेल्या एका कामगारास भरधाव टेम्पोने चिरडल्याने तो जागीच ठार झाला.
वाळूज महानगर : सायकलवरून कंपनीत कामाला चाललेल्या एका कामगारास भरधाव टेम्पोने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक टेम्पोसह फरार झाला. ही घटना शनिवारी (दि. ८) सकाळी ७ वाजेदरम्यान बजाजनगरातील एफडीसी चौकात घडली.
सोमनाथ काशीनाथ कुंभार (३५, रा. घोडेगाव कुकाणा, ता. नेवासा. जि. अहमदनगर, ह. मु. रांजणगाव शेणपुंजी) वाळूज औद्योगिक क्षेत्रातील औरंगाबाद आॅटो या कंपनीत कामाला आहे. सोमनाथ कुंभार शनिवारी सकाळी रांजणगाव येथून सायकलवर कंपनीत कामाला निघाले. सकाळी ७ वाजेदरम्यान बजाजनगरातील एफडीसी चौकात पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने (क्रमांक एमएच- २०, सीटी ११४१) कुं भार यांच्या सायकलला जोराची धडक दिली. या धडकेने कुंभार खाली पडले.
भरधाव टेम्पोचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात कुंभार जागीच ठार झाले. घटनास्थळावरून चालक टेम्पोसह पळून गेला. प्रत्यक्षदर्शी असलेले सुरेश गाडेकर यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचले.
गंभीर जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी विचारपूस सुरू केली.
औरंगाबाद आॅटो कंपनीतील सुपरवायझर गजानन राघुडे यांनी सदर व्यक्ती ही सोमनाथ कुंभार असून, तो औरंगाबाद आॅटो कंपनीत काम करीत असल्याचे सांगितले. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सुरेश गाडेकर, कुंदन जाधव, सोमीनाथ सावंत, दिलीप पाटील यांच्या मदतीने कुंभार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी फरार टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार भास्कर खरात हे पुढील तपास करीत आहेत.