जुन्या मोंढ्यात कचऱ्याला लागलेल्या आगीतून टेम्पो, लाकडी शेड खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 06:44 PM2019-01-23T18:44:32+5:302019-01-23T18:45:17+5:30
टेम्पोमध्ये ८ टन साखर होती, त्यावर पाणी पडून पाक तयार झाल्याने २ लाख ६८ हजार रुपयाचे नुकसान झाले.
औरंगाबाद : जुना मोंढ्यात आज दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान कचऱ्याला लागलेल्या आगीने लाकडाचे शेड व एक टेम्पो जळून खाक झाला. टेम्पोमध्ये ८ टन साखर होती, त्यावर पाणी पडून पाक तयार झाल्याने २ लाख ६८ हजार रुपयाचे नुकसान झाले.
शहराच्या मध्यवर्ती असलेली धान्याची मुख्य बाजारपेठ जुन्या मोंढ्यात दुपारी २ ते अडीच वाजेदरम्यान आग लागली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच बघणाऱ्यांची गर्दी उसळली. एकीकडे आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान प्रयत्न करीत होते तर दुसरीकडे बघण्यांची गर्दी आवरण्याचे काम पोलीसांना करावे लागत होते. जिथे आग लागली, तिथे पाठीमागील बाजूस कचराकुंडी निर्माण झाली होती.
या कचऱ्याला सुरुवातील आग लागली. यानंतर आगीने समोरचे लाकडी शेड व टेम्पोला कवेत घेतले. यात शेड आणि टेम्पो जळून खाक झाले. टेम्पोत साखरेची पोती होती, आग व त्यात पाणी पडल्याने साखरेचा पाक झाला होता. बाजारभावानुसार साखरेची किंमत २ लाख ६८ हजार रुपय होती. १५ ते २० मिनीटाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आग जास्त भडकली असती तर आजूबाजूच्या दुकानीही याच्या लपेटात येऊन मोठी हानी झाली असती, पण आग लवकर आटोक्यात आली, असे बाजार समितीचे संचालक प्रशांत सोकिया यांनी सांगितले.
पहा व्हिडिओ :