औट्रम घाटात पावसामुळे दरडी कोसळल्या; सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरती वाहतूक बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 18:53 IST2024-08-22T18:52:53+5:302024-08-22T18:53:23+5:30
घाटाच्या सुरुवातीस व शेवटी लवकरच सुविधा पुरविण्याचे एनएचएआयचे आश्वासन

औट्रम घाटात पावसामुळे दरडी कोसळल्या; सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरती वाहतूक बंदी
छत्रपती संभाजीनगर : सोमवारी मध्यरात्रीच्या धो-धो पावसामुळे औट्रम घाटात दरडी कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. राष्ट्रीय महामार्ग आपत्ती निवारण पथकाने दोन तासांत दरडी दूर करून रस्ता मोकळा केला. घाटातील दरडी ठिसूळ झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अनिश्चित काळासाठी या घाटातून तात्पुरत्या वाहतूक बंदीचा आदेश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी मंगळवारी दिला.
पोलिसांच्या विनंतीनुसार एनएचएआयने औट्रम घाटातील पोलिस चौकीसाठी ‘पोर्टेबल केबिन’ तयार करून दिली आहे. एनएचएआयच्या तज्ज्ञ समितीने कन्नड घाटातील चार पर्यायी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवला आहे. केंद्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाच्या निर्णयानंतर खंडपीठास त्याबाबत सूचित करण्यात येईल, असे एनएचएआयचे वकील सुहास उरगुंडे यांनी निदर्शनास आणून दिले. एनएचएआयने तत्परतेने घाटातील मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल, तसेच इतर बाबतीतही त्यांनी एकूणच उचललेल्या पावलांबद्दल खंडपीठाने त्यांची प्रशंसा केली. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे व केंद्र शासनातर्फे असिस्टन्ट सॉलिसीटर जनरल अजय तल्हार यांनी काम पाहिले.
प्रवाशांना सुविधा पुरविण्याचे आश्वासन
आपत्तीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी औट्रम घाटातील मार्गात विश्रांती गृह (रेस्ट रूम), पिण्याच्या पाण्याची सोय, रुग्णवाहिका, प्रथमोपचार व इतर आनुषंगिक सुविधा पुरविण्याची मागणी याचिकाकर्ते ॲड. ज्ञानेश्वर बागूल आणि ॲड. देसले यांनी केली. मात्र, अरुंद रस्ता व अभयारण्यामुळे घाटात वरील सुविधा देता येणार नाहीत; परंतु घाटाच्या सुरुवातीस व शेवटी वरील सुविधा लवकरच पुरविण्याचे आश्वासन एनएचएआयने खंडपीठ नियुक्त समितीला दिल्याचे निवेदन करण्यात आले. ते खंडपीठाने रेकॉर्डवर घेतले.