बिडकीन इंडस्ट्रियल पार्कचे तात्पुरते कार्यालय सुरू

By Admin | Published: July 17, 2017 12:47 AM2017-07-17T00:47:40+5:302017-07-17T00:59:02+5:30

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल-कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील बिडकीन परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासकामांचे कंत्राट एल अँड टी कंपनीला मिळाले

Temporary office of Bidkin Industrial Park | बिडकीन इंडस्ट्रियल पार्कचे तात्पुरते कार्यालय सुरू

बिडकीन इंडस्ट्रियल पार्कचे तात्पुरते कार्यालय सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल-कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील बिडकीन परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासकामांचे कंत्राट एल अँड टी कंपनीला मिळाले असून, कंपनीचे साइटवर तात्पुरते कार्यालय सुरू झाले आहे. फरशी पुलापासून कामाला सुरुवात झाली आहे. १३४० कोटी रुपयांचे हे कंत्राट असून, आगामी तीन ते चार महिन्यांत बिडकीन येथील प्रशासकीय इमारतीसह विविध कामांचे भूमिपूजन होईल, असा दावा सूत्रांनी केला. पैठण रोडपासून काही अंतरावर प्रकल्पासाठी अंतर्गत रस्त्यांसाठी सपाटीकरण सुरू झाले आहे.
बिडकीनमधील सुमारे २ हजार ५०० एकर जागेत पायाभूत सुविधा दिल्या जातील. बिडकीनच्या निविदेत शापूर्जी अँड पालंजी, एल अँड टी आणि एन.सी.सी. या तीन कंपन्यांचा समावेश होता. एल अँड टी कंपनीने अंदाजे १२ टक्के कमी दर निविदा भरली होती.
१६ जून रोजी निविदा अंतिम झाल्यानंतर महिनाभरातच कंपनीने बिडकीनसाठी कार्यालय सुरू केले आहे. पायाभूत सुविधांमध्ये प्रामुख्याने रस्त्याची निर्मिती, ड्रेनेज, ग्रीन कॉरिडॉर, डब्ल्यूएसटीपी, जलशुद्धीकरण प्लांट व इतर कामे एल अँड टी बिडकीनपट्ट्यात संपादित केलेल्या जमिनीवर करणार आहे.
लवकरच भूमिपूजन
बिडकीन इंडस्ट्रियल पार्कमध्ये पायाभूत सुविधांसाठी ६ हजार ८८० कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली. तीन टप्प्यांत हा निधी वापरण्यात येणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज, दूरसंचार सुविधा तसेच आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल असा या भागात नियोजनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या फेजमधील ही कामे असतील. लवकरच भूमिपूजन होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Temporary office of Bidkin Industrial Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.