‘दहा फूट मागे मागे’; महापालिकेची अतिक्रमणाविरोधात नाविन्यपूर्ण योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:14 PM2020-02-15T19:14:36+5:302020-02-15T19:17:37+5:30
मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची संकल्पना
औरंगाबाद : शहराला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. जिथे जागा दिसेल तेथे अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘दहा फूट मागे मागे’ ही नावीन्यपूर्ण योजना शहरात लवकरच राबविण्यात येणार आहे. अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
भविष्यात येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी देणे हे आपले कर्तव्य आहे. ‘जिथे झाड तिथे पाऊस’ ही संकल्पना घेऊन महापालिका काम करणार आहे. झाडे वाढविली पाहिजेत. मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन हब तयार करावे लागणार आहेत. या कामासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही होकार दर्शविला आहे. झाड लावायचे तरी कोठे, असा प्रश्न सध्या निर्माण होतो. जिथे तिथे अतिक्रमणे झाली आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणेच अतिक्रमणे आहेत. आमखास मैैदानावर अतिक्रमणे काढून यशस्वीपणे वृक्षारोप करण्यात आले. दिल्लीगेटवर अतिक्रमणे काढून वृक्षारोप केले. शहरात ठिकठिकाणी अशा पद्धतीने मोहीम राबविण्यात येईल. त्यापूर्वी अतिक्रमण केलेल्यांना स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्या, अशी विनंती मनपाकडून करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले. ‘१० फूट मागे मागे’ या योजनेत स्वत:हून अतिक्रमणे दहा फूट मागे न घेतल्यास महापालिकेचा जेसीबी पुढील काम करणार आहे.
शौचालयांची संख्या वाढविणार
शहराची एक मोठी समस्या म्हणजे शैचालयांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ही संख्या वाढविण्यासाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही मॉडेल शौचालये लवकरच सुरू केले जातील. नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाल्यास त्याची संख्या अधिक वाढविली जाणार आहे. शौचालये नसल्याने महिलांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
सरोवर परिसरात चांगले लोक आले पाहिजेत
सलीम अली सरोवरात पक्षी आलेच पाहिजेत. पक्ष्यांसाठी हे नंदनवन आहे. सरोवराचा वाद न्यायप्रविष्ट आहे. येथे सर्वसामान्य चांगले नागरिक जोपर्यंत जाणार नाहीत, तोपर्यंत नकारात्मक मानसिकता ठेवणाऱ्यांचा वावर तेथे वाढेल, असेही पाण्डेय यांनी नमूद केले.
‘लोकमत’चा पाठपुरावा
शहरातील प्रमुख रस्त्यांवर चालण्यासाठीही जागा मिळत नसल्याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशित केली होती. या वृत्त मालिकेची दखल खंडपीठाने घेतली होती. खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पायीसुद्धा चालणे मुश्कील झाले आहे.४ ‘लोकमत’च्या वृत्त मालिकेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली होती. बैठकीस पोलीस उपायुक्त मीना मकवाना, पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे उपस्थित होते. मनपाने यासंदर्भात अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे आश्वासन दिले होते. आजपर्यंत असा कोणताही अॅक्शन प्लॅन मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तयार केला नाही.